पालिका निवडणूक : पक्षांतरासाठी लगीनघाई; उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:32 PM2020-03-11T23:32:16+5:302020-03-11T23:32:42+5:30
शिवसेनेच्या या गटाच्या संघर्षाचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप आणि काँग्रेस करत आहे. काँग्रेसने शहरातील जास्तीत जास्त प्रभागात उमेदवार कामाला लावले आहेत. अ
अंबरनाथ : आगामी पालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आरक्षण निश्चितीमुळे उमेदवारही निश्चित होत आहेत. त्यामुळे अनेक जण उमेदवारी मिळविण्यासाठी दुसºया पक्षात प्रवेश करत आहेत. काहींनी जाहीर प्रवेश केला आहे, तर काहींनी केवळ संपर्कात राहून उमेदवारी निश्चितीची वाट पाहणे पसंत केले आहे.
अंबरनाथ शहरात शिवसेनेची ताकद जास्त असल्याने इच्छुकांची संख्याही सेनेत अधिक प्रमाणात आहे. मात्र, प्रत्येक प्रभागात एक ते चार इच्छुक असतील तर एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने इतर इच्छुकांच्या वाट्याला निराशा येणार आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी उमेदवारी निश्चिती होण्याआधीच पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. तर काही नगरसेवकही इतर पक्षात प्रवेश करत आहेत. त्याचा प्रत्यय शिवसेना नगरसेवकाला आला आहे. शिवसेना नगरसेवक रोहित महाडिक या युवा नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला पहिला धक्का दिला आहे. महाडिक यांना सभापतिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना निश्चित केलेल पद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच त्यांचे पूर्वीचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष अभिजीत करंजुले यांनी त्यांचा प्रभाग त्यांना सोडण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे महाडिक यांनी शिवसेना सोडत भाजपमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चिती केली आहे. शिवसेनेतील पहिला नगरसेवक भाजपच्या वाट्याला आला आहे. तर काही आणखी नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना हेरण्याचे काम भाजप आणि काँग्रेसच्या वतीने सुरू आहे. नगरसेवकांना उमेदवारीसाठी पक्षात घेण्याची प्रक्रिया जोरात असताना काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या व्यतिरिक्त पक्षातील पदाधिकाºयांना हेरण्याचे काम भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे करत आहेत.
भाजपने शिवसेनेचा एक नगरसेवक आपल्याकडे वळविल्यावर आता शिवसेनाही सतर्क झाली आहे. त्यांनीही पक्षातील नगरसेवक आणि इच्छुकांना विश्वासात घेण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेना शहरात एकसंघ वाटत असली तरी शिवसेनेतील अंबरनाथमध्ये जे दोन गट आहेत ते दोन्ही गट आपआपल्या गटातील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे दोन्ही गटांकडून आपल्या मर्जीतील उमेदवारांना पुढे केले जात आहे. स्वत:चे नगरसेवक जिंकण्याचे प्रयत्न सुरू असले तरी दुसºया गटातील नगरसेवकांचा बळी कसा पडेल याचाही विचार सातत्याने केला जात आहे.
इच्छुकांकडून प्रचाराला सुरूवात
शिवसेनेच्या या गटाच्या संघर्षाचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप आणि काँग्रेस करत आहे. काँग्रेसने शहरातील जास्तीत जास्त प्रभागात उमेदवार कामाला लावले आहेत. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अनेक इच्छुक हे प्रभागात काम करत आहेत, तर शिवसेनेच्या काही इच्छुकांनीही विलंब न करता आता प्रभागात व्यक्तिगत प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, उमेदवार निश्चितीनंतर पक्षांतराचे गणित आणखी बिघडणार हे निश्चित मानले जात आहे.