पालिका कर्मचारी असल्याचे सांगून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:24 AM2019-02-27T00:24:33+5:302019-02-27T00:24:35+5:30
तिघांना अटक : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही लूट
कल्याण : पोलीस तसेच केडीएमसीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून एका तरुणाला मारहाण करत त्याच्याकडील रोख रकमेसह मोबाइल लांबवणाऱ्या विशाल आल्हाट (२९), राजेश भगत (३०, दोघे, रा. कल्याण) आणि मंगेश कांदू (३२, रा. आंबिवली) यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली. कल्याण न्यायालयाने सर्वांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरातही त्यांनी अशाच प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतील धारावी परिसरात राहणारा मोहम्मद अन्सारी (२०) सोमवारी दुपारी २ च्या सुमारास भिवंडी येथे कल्याणमध्ये आला होता. यावेळी, स्कायवॉकवरून भिवंडीकडे जाणाऱ्या रिक्षा स्टॅण्डकडे जात असताना एकाने मोहम्मदला पकडले. यावेळी याठिकाणी उभ्या असलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मोहम्मदकडील पिशवी तपासली. त्यात पॉलिथीनची पिशवी आढळताच आम्ही केडीएमसीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत दंड भरावा लागणार असल्याचे त्यांनी मोहम्मदला सांगितले. तसेच, एकाने पोलीस असल्याचे सांगत पोलीस ठाण्यात नेण्याची धमकीही दिली. यासर्व प्रकारामुळे घाबरून त्यांच्यासोबत जाण्यास तयार झालेल्या मोहम्मदला जवळील झाडाझुडपात नेत चौकडीने मारहाण केली व ते रोख रक्कम आणि मोबाइल असा चार हजार पाचशेचा मुद्देमाल घेऊ न पसार झाले.
मुंबई महापालिकेच्या ‘क्लिनअप’मध्ये कंत्राटी पद्धतीत आरोपी कामाला होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे. आतापर्यंत किती जणांना फसवले आहे हे तपासात निष्पन्न होईल.
- सुरेश डांबरे,
सहायक पोलीस निरीक्षक