पालिकेच्या कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण आणि धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:35+5:302021-09-10T04:48:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : एकीकडे ठाणे शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी महापालिकेच्या सहायक आयुक्तांची बोटे तोडल्याची घटना ताजी आहे. तेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : एकीकडे ठाणे शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी महापालिकेच्या सहायक आयुक्तांची बोटे तोडल्याची घटना ताजी आहे. तेच आता अंबरनाथमध्ये सुद्धा मुजोर परप्रांतीय फेरीवाल्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे. एवढा गंभीर प्रकार घडल्यानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोटचेपे धोरण अवलंबिले आहे. एवढेच नव्हे तर याप्रकरणी साधा गुन्हादेखील दाखल करण्यात आला नाही.
अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बस्तान मांडले आहे. गर्दीच्या वेळी तर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना चालायलाही जागा उरत नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. यावेळी फेरीवाल्यांना त्यांच्या पाट्या आणि अन्य सामान उचलण्यास हे कर्मचारी सांगत होते. मात्र, याच दरम्यान काही परप्रांतीय मुजोर फेरीवाले त्याठिकाणी आले आणि त्यांनी अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केली. अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी आनंद भिवाल, उमेश जहागीरदार, लक्ष्मण फर्डे आणि चालक नरेश पोटाळे या चौघांना यावेळी धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर कर्मचारी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे लक्षात येताच या फेरीवाल्यांनी त्यांना धमकावले. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनीही बोटचेपे धोरण स्वीकारत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नाही. उगाच वाद वाढेल असे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला. अधिक धक्कादायक बाब म्हणजे रात्री उशिरापर्यंत अंबरनाथ नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील त्याची कल्पना देण्यात आलेली नव्हती.
--------------
फोटो आहेत