महापालिका अधिकारी - कर्मचा-यांना समज द्या, वाहतूक पोलिसांनी धाडले महापालिकेस पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 06:37 PM2020-05-28T18:37:12+5:302020-05-28T18:37:19+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.
धीरज परब
मीरारोड - कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात रस्त्यांवर नेहमीसारखी वाहतूक कोंडी नसते. तरी देखील वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने सरकारी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य वाहनांना बंदी आहे. त्यामुळे शहरात एरव्ही होते तशी वाहतूक कोंडी नसते. तसे असले तरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या वतीने अशा वाहनांवर नियमित कारवाई केली जात आहे.
ठाणे ग्रामीण वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी या बाबतचे लेखी पत्रच महापालिकेस दिले आहे. त्यात पवार यांनी म्हटले आहे की, वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहतुक पोलीसां कडुन कारवाई दरम्यान महापालिकेचे अनेक कर्मचारी विना हेल्मेट आढळतात. महापालिकेची व ठेक्यावरची लहान - मोठी वाहने चालवताना देखील सीट बेल्ट न बांधणे, सिग्नल तोडणे तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात.
त्यांना पोलिसांनी पकडले की ते कर्मचारी, आम्ही पालिकेचे कर्मचारी असून पालिकेचे काम करतो असे सांगतात. तुम्ही आमच्यावर कारवाई करू नका असे सांगून पोलिसांसोबत वाद घालतात. सदर प्रकार सरकारी कर्मचा-यांना शोभणारा नाही. अशा प्रकारांमुळे सामान्य जनतेत देखील कारवाईदरम्यान पोलीस पक्षपात करतात, असा संशय होऊन नाराजी वाढते. त्यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांना वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात यावी, असे पवार यांनी पालिकेला कळवले आहे.