महापालिका शिक्षकांची होणार गुणवत्तापडताळणी; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:43 AM2020-03-13T00:43:20+5:302020-03-13T00:43:31+5:30

शिक्षण विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात पौष्टिक आहारासाठी पाच कोटी, डीबीटी अंतर्गत लाभ योजनेसाठी चार कोटी, गणवेश पाच कोटी, डिजिटल क्लासरूमसाठी ७.५० कोटी, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी १३ कोटी प्रस्तावित केले आहेत.

Municipal teachers will have quality checks; Provide expert guidance | महापालिका शिक्षकांची होणार गुणवत्तापडताळणी; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देणार

महापालिका शिक्षकांची होणार गुणवत्तापडताळणी; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देणार

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०२०-२१ च्या ३,७८० कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात ठाणेकरांना नव्या कोणत्याही योजना मिळणार नसून, जुन्याच योजना पूर्ण करण्यावर भर दिला आहे. असे असले तरी आता महापालिका शाळेतील शिक्षकांची गुणवत्तातपासणी केली जाणार आहे. त्यातून जे शिक्षक यात मागे असतील त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय टिंकरिंग लॅब, गटनिहाय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आणि फुटबॉल प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आदी काही महत्त्वाच्या योजनांचा अंतर्भाव यात केला आहे.

शिक्षण विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात पौष्टिक आहारासाठी पाच कोटी, डीबीटी अंतर्गत लाभ योजनेसाठी चार कोटी, गणवेश पाच कोटी, डिजिटल क्लासरूमसाठी ७.५० कोटी, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी १३ कोटी प्रस्तावित केले आहेत. विशेष म्हणजे, अशा विद्यार्थ्यांचा पट वाढविण्याबरोबर त्यांच्याकडून चांगले धडे गिरविण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकांची गुणवत्तापडताळणीही केली जाणार आहे. यानुसार शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापनाची तंत्रे या दोन्ही बाबींचे ज्ञान शिक्षकांना देणे गरजेचे आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होईल. यासाठी शासकीय यंत्रणेकडून शिक्षकांची चाचणी घेऊन तिच्या अहवालानंतर शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद प्रस्तावित आहे.

टिंकरिंग लॅब - देशात शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज (एटीएल) स्थापन करण्यात येत आहेत. याच धर्तीवर महापालिका शाळांमधील सहावी ते दहावीच्या मुलांना मनात उत्सुकता, सर्जनशीलता आणि कल्पना विकसित करण्याचा उद्देश आहे. यात विद्यार्थ्यांमध्ये डिझाइन मानसिकता, संगणकीय विचार, अनुकूल शिक्षण, भौतिक संगणना आदी कौशल्याच्या माध्यमातून नवीन वैज्ञानिक विचारांवर वाव देण्यात येणार आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे.

गटनिहाय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व त्यासाठी पूरकवाचनाची पुस्तके सहज उपलब्ध करून देण्यासाठी गटस्तरावर-गटशाळेत प्रत्येकी एक ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद प्रस्तावित आहे.

फुटबॉल प्रशिक्षण - आरोग्य सुदृढतेच्या दृष्टीने आता जास्तीत जास्त मुलांना मैदानी खेळ खेळण्याबाबत पुढाकार घेऊन फुटबॉल संघ तयार करण्यात येणार आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा फी, पुस्तके व मार्गदर्शन - शासनाकडून दरवर्षी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने बसविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यानुसार यासाठी शासन फी भरणे, पूरक साहित्य पुरविण्याचे काम शिक्षण विभाग करणार आहे. यासाठी ६० लाखांची तरतूद केली आहे.

Web Title: Municipal teachers will have quality checks; Provide expert guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.