भाईंदरमध्ये बेकायदा बांधकामासाठी पालिका पथकाला काेंडले; कारवाईला बिल्डरचा विराेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:34 AM2023-02-23T06:34:46+5:302023-02-23T06:35:02+5:30
प्रवेशद्वाराला टाळे लावून अर्धा तास धरले वेठीस
मीरा रोड - भाईंदर येथील एका इमारतीत बिल्डरने केलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या सहायक आयुक्तांसह पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून अर्धा तास इमारतीच्या आवाराच्या प्रवेशद्वाराला टाळे लावून वेठीस धरल्याचा प्रकार घडला आहे. भाईंदर पोलिस ठाण्यात बुधवारी बिल्डर व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.
भाईंदर पश्चिमेतील सॉलिटेअर हाइट्स या इमारतीत कल्पेश जैन व प्रकाश जैन यांनी मोकळ्या जागेत यांत्रिक पार्किंग तसेच अन्य बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार आली हाेती. त्यानंतर नगररचना विभागाने मंजूर नकाशाव्यतिरिक्त बेकायदा बांधकाम झाल्याचे प्रभाग समिती १ च्या सहायक आयुक्त कांचन गायकवाड यांना कळविले. प्रभाग समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी बांधकाम ठिकाणी जाऊन खात्री केली असता गायकवाड यांनी कल्पेश जैन, प्रकाश जैन व सल्लागार अभियंता मे. बी.ए.सी. प्लॅनर्स ॲण्ड इंजिनीअर्स यांना मॅकेनिकल पार्किंगचे बेकायदा बांधकाम त्वरित काढून टाकण्याची नोटीस ३० जानेवारीला बजावली होती.
महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना बेकायदा बांधकाम करणारे आणि अन्य कोणाचेही बेकायदा प्रकार खपवून घेणार नाही. - मारुती गायकवाड, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका