महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना, ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 02:37 PM2021-07-25T14:37:04+5:302021-07-25T14:37:11+5:30

Mahad Flood: राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत.

Municipal teams dispatched for Mahad-Poladpur, Thane Municipal Commissioner's information | महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना, ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती

महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना, ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती

Next

 ठाणे: रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १०० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी आज रवाना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली. 

राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत. महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त(१) व अतिरिक्त आयुक्त (२) यांच्या समन्वयाने ही पथके मदत कार्य करणार आहेत.
          
 या विविध पथकातंर्गत आरोग्य पथक पाठविण्यात येणार असून या पथकामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके पाठविण्यात येणार आहेत. या पथकांसोबत १० हजार रॅपीड ॲंटीजन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात येणार आहे. साफसफाई, फवारणीसाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, फायलेरिया कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत २४ पंप, ४ स्प्रेईंग मशीन, ४ फॅागिंग मशीन, सोडियम हायपोक्लाराईड व फवारणीसाठी लागणारे सर्व रसायणे आदीसह सुसज्ज ९० कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात येत आहे. 
          
 तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा १० हजार लिटर्स क्षमतेचा एक टॅंकर असे एकूण दोन टॅंकर पाठविण्यात येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे दोन ट्रक, रेशनिंग, किटस्, ५ हजार सतरंजीही पाठविण्यात येणार आहेत. मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमही रवाना होत असून या सर्व पथकांसोबत महापालिकेच्या ८ ते ९ मिनी बसेस, दोन डंपर, २ ट्रक, ४ जीप आणि इतर साहित्य पाठविण्यात येणार आहे. 
          
 दरम्यान पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफ जवानांचे एक पथक पहिल्या दिवसांपासून मदत कार्यात गुंतले असून पालकमंत्री  एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के हे दोन दिवस महाड येथे तळ ठोकून मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. महापालिकेची ही विविध पथके उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली रवाना होणार असून ही पथके स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत. 

कोविड चाचणी आणि ताप सर्वेक्षण
महाड आणि पोलादपूर येथील नैसर्गिक आपत्तीनंतर कुठलाही साथरोग उद्भवू नये तसेच कोविडचा संसर्ग वेळीच प्रतिबंधीत करता यावा यासाठी मोबाईल टेस्टींग व्हॅन, १० हजार रॅपिड ॲंटीजन टेस्टींग कीटस् तसेच ताप सर्वेक्षणासाठी थर्मल गन्स, ॲाक्सीमीटर, मोठ्या प्रमाणात औषध साठा आणि कर्मचाऱ्यांची टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. तसेच साथरोग नियंत्रणासाठीही स्वतंत्र वैद्यकीय पथक रवाना होत असल्याचे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.

Web Title: Municipal teams dispatched for Mahad-Poladpur, Thane Municipal Commissioner's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे