महाड-पोलादपूरसाठी महापालिकेची पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:56+5:302021-07-26T04:35:56+5:30
ठाणे : रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य, घनकचरा, ...
ठाणे : रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १०० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारीवर्ग रविवारी रवाना केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाडला रवाना केली आहे. या विविध पथकांतर्गत आरोग्यपथक पाठविण्यात येणार असून, या पथकामध्ये कोविड, साथरोग आणि ताप सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथकांचाही समावेश आहे. या पथकांसोबत दहा हजार रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्स, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टिंग किट्स, तीन डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात येणार आहे. साफसफाई, फवारणीसाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, फायलेरिया कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत २४ पंप, चार स्प्रेईंग मशीन, चार फॉगिंग मशीन, सोडियम हायपोक्लोराइड आणि फवारणीसाठी लागणारी सर्व सामग्रीसह ९० कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तेथील नागरिकांसाठी दहा हजार लिटर्स पाण्याचा एक टँकर आणि स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा दहा हजार लिटर्स क्षमतेचा एक टँकर असे दोन टँकर पाठविण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे दोन ट्रक, रेशनिंग, किट्स आणि पाच हजार सतरंजींचाही या सामग्रीमध्ये समावेश आहे.
* ठाण्यातून दहा हजार रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्स
महाड आणि पोलादपूर येथील नैसर्गिक आपत्तीनंतर कुठलाही साथरोग उद्भवू नये तसेच कोविडचा संसर्ग वेळीच प्रतिबंधित करता यावा यासाठी मोबाइल टेस्टिंग व्हॅन, दहा हजार रॅपिड ॲंटिजन टेस्टिंग किट्स तसेच ताप सर्वेक्षणासाठी थर्मल गन्स, ऑक्सिमीटर, मोठ्या प्रमाणात औषध साठा घेऊन कर्मचाऱ्यांची टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. साथरोग नियंत्रणासाठीही स्वतंत्र वैद्यकीय पथक रवाना होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.