उद्याने, मैदानातील कोरोना नियमभंगाकडे महापालिका, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:42 AM2021-08-23T04:42:44+5:302021-08-23T04:42:44+5:30
मीरा भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उद्याने, मैदाने व चौपाट्या पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यास ...
मीरा भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उद्याने, मैदाने व चौपाट्या पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यास परवानगी आहे. येथे नागरिकांकडून कोरोना नियमांचा भंग केला जात असून महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष चालविल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची भीती जागरूक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुमारे ७९ उद्याने, १२ मैदाने, भाईंदर पूर्व - पश्चिम चौपाटी तसेच उत्तन व घोडबंदर चौपाटी असून या ठिकाणची सुरक्षा, स्वच्छता, देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. कोरोनाच्या अनुषंगाने उद्याने, मैदाने व चौपाट्या लोकांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. परंतु बंद असतानासुद्धा चौपाट्यांवर लोकांचा राबता असायचा. पोलिसांनी तर अनेकांवर मॉर्निंग वॉकला बाहेर फिरल्याप्रकरणी गुन्हेही दाखल केले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सध्या उद्याने, मैदाने व चौपाट्या पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुल्या ठेवल्या जात असल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. सायंकाळच्या वेळेत सर्व बंद असले तरी, जेसलपार्कसारख्या चौपाटी - उद्यानलगत लोकांची गर्दी असते.
उद्याने, मैदाने, चौपाट्या या नागरिकांसाठी कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करून खुल्या केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात लोकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात आहे का नाही, यावर देखरेख ठेवणारी कोणतीच यंत्रणा महापालिकेने उभारलेली नाही. सुरक्षा रक्षकसुद्धा हवालदिल बनल्यागत चित्र दिसते. नगरसेवकसुद्धा या गंभीर मुद्द्यावर उदासीनता दाखवतात. परिणामी महापालिकेच्या उद्याने, मैदाने, चौपाट्यांवर अनेकजण विनामास्क वावरत असल्याने यातून कोरोनाचा संसर्ग पसरू नये, अशी भीती जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.