‘आपला दवाखाना’साठी पालिकेला ठेकेदारच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:43 PM2019-12-16T23:43:54+5:302019-12-16T23:43:56+5:30
सातवेळा दिली मुदतवाढ : मर्जीतील ठेकेदाराकरिता खेळीची चर्चा
अजित मांडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिल्लीतील ‘मोहल्ला क्लिनिक’ या संकल्पनेवर आधारित ठाणे महापालिकेने ठाण्यातही ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राबविण्याच्या निश्चित केलेल्या योजनेला तब्बल सातवेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार लाभलेला नाही.
या प्रस्तावाला जूनमध्ये झालेल्या महासभेत मंजुरीदेखील मिळाली. गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून ही संकल्पना पुढे आणली असून योजनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित झाले आहे. परंतु, महापालिका स्तरावर पाच वेळा आणि त्यानंतर आयुक्तांच्या स्तरावर दोन वेळा अशी तब्बल सात वेळा मुदतवाढ देऊनही योजनेसाठी एकही ठेकेदार पुढे आलेला नाही. त्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील ही योजना कागदावरच राहणार काय, अशी शंका निर्माण झाली आहे. मात्र मर्जीतील ठेकेदारालाच हे काम मिळावे म्हणून मुदतवाढीच्या फेऱ्यात तर ही योजना फसवली जात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला किसननगर आणि महात्मा फुलेनगर भागात ही संकल्पना राबविली गेली. या दोन्ही केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा पालिकेने केला. परंतु, तो दावा फोल ठरला. असे असतानाही आणि विरोधकांचा विरोध असताना केवळ स्व. बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊन ‘मातोश्री’ला खूश करण्यासाठी ही संकल्पना सत्ताधारी दामटत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
मोफत मिळणाºया सुविधांसाठी १६० कोटींचा चुराडा
१ठाणे महानगरपालिकेने मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना’ (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य केंद्र सुरू करताना दर ५० हजार नागरिकांमागे एक आरोग्य केंद्र असावे, असा नियम आहे.
२ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के लोक हे चाळी आणि झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहेत. लोकसंख्येचे हे प्रमाण पाहता ठाणे शहरात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात २८ आरोग्य केंदे्र आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंदे्र सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाणार असल्याची टीका सुरुवातीला करण्यात आली होती.
३ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रु पये दर आकारला जाणार आहे. ‘आपला दवाखाना’मुळे ठाणे महापालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे सुमारे १५९.६० कोटी खाजगी संस्थेला द्यावे लागणार आहेत.
‘आपला दवाखाना’प्रशासनाला का हवे?
ठाण्यातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि महापालिकेची २८ आरोग्य केंदे्र कार्यरत आहेत. शिवाजी महाराज रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये वार्षिक १० लाख २४ हजार ९६५ रुग्णांवर बाह्यरुग्ण कक्षात उपचार केले जातात. तर, वार्षिक ४२ हजार रुग्णांना आंतररुग्ण म्हणून दाखल करून उपाचार केले जातात.
वार्षिक१० हजारांच्या आसपास प्रसूती महापालिका रुग्णालयांमध्ये होतात. लोकसंख्येच्या मानाने शहरातील आरोग्य सुविधांवर ताण असून रुग्णांवर योग्य उपचार होताना दिसत नाहीत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत आपला दवाखाना ही संकल्पना राबविली जाणार आहे.
ही सेवा सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० यावेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय, या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाºया रुग्णाला १०० टक्के मोफत उपचार मिळणार आहेत. या संकल्पनेत दवाखाना उभारणीचा खर्च, त्याठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाड्याने घेणे, हा खर्च संबंधित संस्थाच करणार आहे.
एक ‘आपला दवाखाना’ सुरू करायचा असेल, तर त्याच्या निर्मितीसाठी ४३ लाख ४७ हजार रु पये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च नियुक्त संस्था करणार आहे. या दवाखान्यात येणाºया रुग्णांची वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा खर्च महापालिका करणार आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला त्याच्या घरापासून अगदी जवळच्या ठिकाणी आणि वेळेत उपचार मिळणार आहेत. यामुळेच संकल्पनेला विरोध असतानाही सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव रेटून मंजूर केला होता.