करवसुलीसाठी महापालिकेने १६८ नळ जोडण्या तोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:37 PM2020-03-11T22:37:40+5:302020-03-11T22:38:00+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या नोंदी नुसार निवासी मालमत्तांची संख्या २ लाख ९९ हजार ७४३ तर खाजगी मालमत्तांची संख्या ५८ हजार २४९ अशी मिळुन एकुण ३ लाख ५७ हजार ९९२ मालमत्ता आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने मालमत्ता व संबंधित अन्य कर वसुली साठी थकबाकीदारांच्या १६८ नळ जोडण्या आता पर्यंत तोडल्या असुन थकबाकीदारांच्या मालमत्तां समोर या वर्षी पुन्हा बँडबाजा वाजवणे सुरु केले आहे. तर पालिकेने १२६ कोटी ४० लाखांची कर वसुली मंगळवार पर्यंत केली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या नोंदी नुसार निवासी मालमत्तांची संख्या २ लाख ९९ हजार ७४३ तर खाजगी मालमत्तांची संख्या ५८ हजार २४९ अशी मिळुन एकुण ३ लाख ५७ हजार ९९२ मालमत्ता आहेत. २४० कोटी रुपयांची एकुण कर वसुली अपेक्षित असली तरी कर विभाग मात्र ६० कोटींची रक्कम ही वसुली योग्य नसल्याचा दावा करत मोबाईल टॉवर, शास्ती, निर्लेखीत केलेल्या व दुबार मालमत्ता कर आकारणीचे कारण पुढे करत आला आहे.
कर विभागाच्या म्हणण्या नुसार १८१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असुन १० मार्च पर्यंत १२६ कोटी ४० लाख रुपयांची वसुली केली गेली आहे. सदर प्रमाण ७० टक्के इतके असुन येत्या २० दिवसात पालिका ९० टक्के इतके करवसुलीचे लक्ष्य गाठेल असा विश्वास कर निर्धारक व संकलक संजय दोंदे यांनी बोलुन दाखवला. कर वसुली साठी थकबाकीदार मालमत्तांच्या नळजोडण्या तोडण्यास घेतल्या असुन १६८ नळ जोडण्या तोडुन पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.
नागरिकांनी कर भरावा यासाठी आवाहन करतानाचा थकबाकीदारांची गय केली जाणार नाही. प्रत्येक प्रभाग समितीसाठी १ या प्रमाणे ६ बँडबाजा पथके तैनात केली आहेत. दर शनिवार व रविवार थकबाकीदारांच्या मालमत्तां समोर जाऊन कर भरावा म्हणुन बँड वाजवला जात आहे. १० वी च्या परिक्षा असल्याने रोज बँड न वाजवता केवळ सुट्टीचे दिवस निवडले आहेत. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासह त्यांची नावे प्रभाग कार्यालये आदी ठिकाणी लावली जातील असे दोंदे यांनी सांगीतले.