उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंवसेविकांचा पालिकेने केला गौरव
By धीरज परब | Published: March 30, 2023 03:28 PM2023-03-30T15:28:43+5:302023-03-30T15:29:08+5:30
आशा स्वयंवसेविका तळागाळात जाऊन सेवा देत असल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - आरोग्य सेवा देत जनजागृती करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा मेळावा घेऊन त्यात सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या तीन आशा स्वयंसेविकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . यावेळी आशा स्वयंवसेवीका तळागाळात जाऊन सेवा देत असल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले .
मीरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत वंचित व झोपडपट्टी भागात राहणाऱ्या जनतेला आरोग्य सेवा, आरोग्य विषयक जनजागृती व विविध आरोग्य योजनांची माहिती होण्यासाठी सुमारे १२६ आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. आशा स्वयंसेविकांना समाजात सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी व त्यांना पुन्हा अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्याकरिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महानगरपालिका स्तरावरील तीन आशा स्वयंसेविकांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार देण्यास शासनाने निधी मंजुर केला आहे.
त्या अनुषंगाने भाईंदरच्या भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगरभवन सभागृहात २९ मार्च रोजी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा दिवस संमेलन व “सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार” सोहळा आयोजित केला होता . यावेळी आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उत्तन आरोग्य केंद्रातील वेरोनीका नुनीस यांना २५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार तर ज्योत्स्ना भोईर यांना १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि भाईंदरच्या विनायक नगर आरोग्य केंद्रातील प्रचिती महंकाळ यांना ५ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले . तिन्ही आशा स्वयंसेविकांना सन्मानपत्र देण्यात आले .
यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे व कल्पिता पिंपळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने, माता व बालकल्याण अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ, सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड, योगेश गुणीजन, प्रियंका भोसले सह आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"