पालिका शाळांना टाळे, सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना पाठवले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:18 AM2018-03-17T03:18:53+5:302018-03-17T03:18:53+5:30
सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेसाठी चक्क पालिका शाळा बंद ठेवून ऐनवेळी शिक्षण परिषद घेतली. यामुळे सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क सुटी असल्याचे सांगून परत पाठवले.
मीरा रोड : सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेसाठी चक्क पालिका शाळा बंद ठेवून ऐनवेळी शिक्षण परिषद घेतली. यामुळे सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क सुटी असल्याचे सांगून परत पाठवले. सरकारच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाखाली शिक्षण परिषद ठिकठिकाणी राज्यात होत आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढ व शाळा प्रगत करण्याचा उद्देश यामागे असला तरी मीरा- भार्इंदरमध्ये मात्र शिक्षण परिषदेसाठी चक्क शाळाच बंद ठेवण्याचा प्रकार पालिकेने केला.
ही परिषद शुक्रवारी सकाळी १०.३० ते ५ पर्यंत भार्इंदरच्या नगरभवन येथील सभागृहात होती. प्रगत शाळेचा मान मिळवणारे कराड नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. शिवाय, उपमहापौर चंद्रकांत वैती, शिक्षणाधिकारी बी.एस. बाबर, प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख, सर्वशिक्षा अभियानाच्या जयश्री भोईर उपस्थित होते. या वेळी मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासह शाळांना प्रगत करण्यावर कोळी यांनी पालिका व अनुदानित शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले. या परिषदेसाठी प्राथमिक विभागाच्या महापालिकेच्या सध्याच्या ३६ शाळांमधील १८२ शिक्षक, तर अनुदानित १८ शाळांच्या सुमारे १०० शिक्षकांना गुरुवारी सायंकाळी घाईगडबडीत कळवले.
आयत्यावेळी ठेवलेल्या या परिषदेमुळे सकाळी बहुतांश शिक्षक शाळांमध्ये न जाता थेट नगरभवनमध्ये हजर झाले. तर, सर्व शिक्षक हे परिषदेसाठी जाणार असल्याने शाळा बंद ठेवल्या जाणार, याची माहितीच विद्यार्थी व पालकांना नव्हती. त्यामुळे सकाळी विद्यार्थी शाळेत आले असता शाळा बंद असल्याचे सांगण्यात आले.
>भोंगळ कारभाराचा नमुना
माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी पालिकेचा अतिशय भोंगळ व बेजबाबदार कारभाराचा हा आणखी एक नमुना असल्याची टीका केली आहे. आयत्यावेळी शाळा बंद सांगून विद्यार्थ्यांना घरी पाठवणे म्हणजे शैक्षणिक नुकसानच नसून त्यांच्या सुरक्षिततेबद्दलही पालिकेला काही सोयरसुतक नाही हेच दिसते, असे ते म्हणाले.