महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाही कोरोनाचा लागण, तर कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 04:35 PM2020-04-18T16:35:29+5:302020-04-18T16:36:08+5:30
ठाण्यात कोरोनाचा शनिवारी आणखी एक बळी गेला आहे. तर आता कोरोना बाधीत रुग्णांसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यालाच आता कोरोनाचा लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन दिवस रात्री डोळ्यात तेल टाकून काम करीत आहे. मात्र आता महापालिकेच्या परवाना विभागातील कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णाचा शनिवारी सकाळी मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ५७ वर्षीय रुग्ण हॉराईजन या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता.
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसात गुणाकाराने कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. कधी पाच तर कधी १०, १५, २० अशा संख्येने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्यात भर पडत आहे. आजच्या घडीला कोरोनाचे शहरात १२० च्या आसपास रुग्ण आहेत. तसेच होम क्वॉरान्टाइन केलेल्या रुग्णांच्या संख्याही शेकडोत आहे. तर पालिकेच्या विलीगकरण कक्षातही १०० हून अधिक नागरीक वास्तव्यास आहेत. दुसरीकडे एखाद्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून संबधीत ठिकाणचा जवळ जवळ एक किमीचा परिसर सील केला जात आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरन्टाइन केले जात आहे. अशा प्रकारे दिवस रात्र हे काम महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. आता काही अधिकाºयांनी आपल्या कोरोनाच्या चाचण्या देखील केल्या आहेत. परंतु सुदैवाने त्या निगेटीव्ह आल्या आहेत. असे असतांनाच आता परवाना विभागातील एका कर्मचाºयालाच आता कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपर्वी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता ती पॉझीटीव्ह आली आहे. हा कर्मचारी पालिका मुख्यालयातील परवाना विभागात कामाला होता. त्यामुळे आता पालिकेच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु झाला असून विभागातील इतर कर्मचाऱ्याचीही आता तपासणी करण्याची तयारी पालिकेने केली आहे.
दरम्यान दुसरीकडे ठाण्यात शनिवारी आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यु ाल्याची मााहिती पालिकेने दिली आहे. गार्डन इस्टेट या भागात हा रुग्ण वास्तव्यास होता. त्याच्यावर हॉराईझन रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यु झाला. त्यांना यापूर्वी अर्धांगवायुचा झटका येऊन गेला होता. तर ठाण्यात आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. तर १२० च्या आसपास नागरीकांना कोरोनाची लागण झाली आहे.