महापालिका करणार जर्मन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोखरलेल्या वृक्षांचे सर्व्हेक्षण
By अजित मांडके | Published: November 2, 2022 06:21 PM2022-11-02T18:21:08+5:302022-11-02T18:21:41+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता शहरातील पोखरलेल्या वृक्षांचे सव्र्हेक्षण करणार आहे. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ठाणे :
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता शहरातील पोखरलेल्या वृक्षांचे सव्र्हेक्षण करणार आहे. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात त्या संदर्भातील खर्चाची बाजू तपासून याचा निर्णय घेतला जाणार आहे. ठाण्यातील वृक्षांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी मात्र निविदा मागवण्यात येणार असून दुसरीकडे वैभव राजे यांनाही बोलवण्याचा पालिका स्तरावर विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत पावसाळा असो किंवा उन्हाळा असो वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होतांना दिसून आली आहे. त्यातही काही वृक्ष वरुन जरी चांगले वाटत असले तरी ते आतून पोखरलेले असल्याचे दिसून आले आहे. ठाणे शहरात मागील काही वर्षात मोठया प्रमाणात सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. इमारती-सोसायट्यांखालील आवारात , पार्किंग, आणि बैठ्या चाळींमधील रस्ते, पदपथ काँक्रीटचे झाले आहेत. अनेक ठिकाणी खेळाची मैदाने देखील काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉकची झालेली दिसत आहेत. शहरात माती दिसेनाशी झाली आहे. जिथे कुठे झाडे आहेत त्यांची खोडं या सिमेंट कॉंक्रीटने वेढलेली दिसत आहेत. पर्यायाने या झाडांच्या मुळांना पसरायला जागा मिळत नसल्यामुळेच मागील काही वर्षात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. २०२०-२१ या वर्षात एकूण ६२८ झाडे उन्मळून पडली आहेत तर या वर्षी ऑगस्टपर्यंत हा आकडा ४६५ च्या घरात पोहचला आहे. ही आकडेवारी शहरातील भीषण परिस्थिती दर्शवत आहे.मागील काही वर्षात शहरातील झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र वृक्ष का पडत आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला वेळ नाही. यामागे शहरातील वाढलेले काँक्रीटीकरण देखील वृक्षांच्या मुळावर येत असल्याचा दावा तज्ञांनी केली आहे. काही झाडे आतून पोखरली देखील जात असल्याने ती कधीही उन्मळून पडू शकतात. त्यामुळे आता अशा झाडांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
ठाणे शहरात नेमकी अशी किती झाडे आहेत याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. अशाप्रकारचे सर्व्हेक्षण हे पहिल्यांदाच होत असल्याने यासाठी या कामात तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करणे आवश्यक असून यासाठी सध्या तरी महाराष्ट्रात वैभव राजे यांची नियुक्ती राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. जर्मन तंत्रज्ञान वापरून अशाप्रकारचे सर्व्हेक्षण करण्याचे ज्ञान राजे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनाच ठाण्यात सर्व्हेक्षण करण्यासाठी बोलावण्याचा पालिकेचा विचार असून दुसरीकडे निविदा मागवून अन्य कोणी तज्ञ हे काम करू शकतात का ? याची देखील चाचपणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.