पालिका कारवाई सुरूच ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:55 AM2017-11-09T00:55:03+5:302017-11-09T00:55:13+5:30
जुन्या बेकायदा बांधकामांची कागदपत्रे तपासून नवीन बांधकामांवर त्वरित कारवाईचे संकेत अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांनी दिले आहेत.
उल्हासनगर : जुन्या बेकायदा बांधकामांची कागदपत्रे तपासून नवीन बांधकामांवर त्वरित कारवाईचे संकेत अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांनी दिले आहेत. जुन्या बांधकामांबाबत कागदपत्रांची पळवाट पालिकेने काढल्याची टीका होत आहे.
उल्हासनगरमधील अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या रुंदीकरणातील बांधकामाबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत मागील आठवड्यात पोलीस संरक्षणात कारवाई सुरू केली. मात्र, प्रशासनावर राजकीय दबाब वाढल्यानंतर दोन दिवसांत पालिकेला कारवाई गुंडाळावी लागली. रुंदीकरणातील बांधकामांबाबत धोरणात्मक निर्णय घेत कारवाई सुरू करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला आहे.
रुंदीकरणातील बाधित ८० ते ९० टक्के दुकानदारांनी दुरुस्तीच्या नावाखाली बहुमजली बांधकाम केले. त्या वेळी महापालिकेने कारवाई न करता, दुर्लक्ष का केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयुक्तांनी सम्राट हॉटेलच्या बांधकामावर कारवाई सुरू करताच व्यापारी आक्रमक झाले. त्यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना मध्यस्थीसाठी बोलवून पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शिष्टमंडळाने आयुक्तांना जाब विचारल्यावर, त्यांच्यात वाद झाला. आयुक्तांनी दुसºया दिवशी रुंदीकरणातील बांधकामप्रकरणी दोन प्रभाग अधिकाºयांना निलंबित केले. तर, चौधरी यांना नगरसेवकपद रद्द का करू नये, अशी नोटीस पाठवली. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पालिका आयुक्तांनी पोलीस संरक्षण मागवून रुंदीकरणातील बांधकामांवर कारवाई सुरू केली. साधारण पुढील आठवड्यापासून पालिका पुन्हा कारवाईचा धडाका लावाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.