पालिका, पक्षात मेहतांसोबत अजिबात काम करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:50 AM2020-01-08T01:50:49+5:302020-01-08T01:50:53+5:30
काँग्रेसची राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारून भाजपला पाठिंंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराची सूत्रे त्यांच्या हाती देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवरुन घूमजाव केले आहे.
मीरा रोड : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेसची राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारून भाजपला पाठिंंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराची सूत्रे त्यांच्या हाती देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवरुन घूमजाव केले आहे. त्यातही स्थानिक भाजप आणि नगरसेवकांवर माजी आमदार नरेंद्र मेहतांना आपला वरचष्मा कायम ठेवायचा असल्याने जैन यांना डालवण्याचे प्रकार सुरुच असल्याच्या तक्रारी जैन व समर्थकांनी चालवल्या आहेत. तर नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात मला साथ देत मेहतांना झिडकारले असल्याने महापालिका व पक्षात त्यांच्यासोबत काम करणार नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जैन यांनी चालवली होती. त्यांच्यात आणि मेहतांमध्ये त्यावरुन टोकाचा वाद सुरु झाला होता. जैन यांना भाजप आणि प्रभागातील कार्यक्रमांना न बोलावण्यापासून विविध मार्गाने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपने तिकीट नाकारल्याने जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला.
निकालानंतर राज्यातील भाजपला सत्ता स्थापनेची गणिते अवघड दिसू लागल्याने अगदी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जैन यांच्याशी संपर्क साधला. जैन यांनी आपण भाजप सोबतच असल्याचा शब्द दिला. पण त्याचवेळी मीरा- भाईंदरच्या नेतृत्वामुळे होत असलेली भाजपची बदनामी रोखून स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार नागरिकांना द्यायचा असेल तर महापालिका व पक्ष संघटनेची सूत्रे आपल्या हाती देण्याची अटही जैन यांनी नेत्यांना घातली होती. त्यावेळी नेत्यांनी जैन यांना शब्द दिला होता.
जैन भाजपसोबत असूनही त्यांना कोणत्या कार्यक्रमाला बोलावायचे नाही, कुणीही त्यांना भेटायचे नाही असे फतवे निघत होते. शुभेच्छा देण्यासाठी भेटणारे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनाही जाब विचारला जायचा. जैन यांनी तक्रार केल्यावर फडणवीस यांनी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाईंदरमध्ये पााठवले. चव्हाण यांनीही भाजपच्या सर्व नगरसेवक आदींची बैठक घेऊन जैन यांना सोबत घेण्याचा वरिष्ठांचा आदेश कळवला. परंतु त्या नंतरही जैन यांना लांबच ठेवले जात आहे.
फडणवीस यांच्याकडे जैन व मेहता यांची एकत्र बैठक झाली. त्या बैठकीत दोघांनी मिळून काम करा अशी सूचना दिली. परंतु नेत्यांनी आधी दिलेला शब्द आणि मेहतांच्या विरोधात दिलेला कौल या मुळे एकत्र काम करणे शक्य नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले. पाठीत खंजीर खूपसून घेण्याऐवजी तलवार घेऊन लढू अशी भूमिका जैन यांनी घेतली होती.
।विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
येत्या १५ जानेवारीपर्यंत या बाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय होणे अपेक्षित असून फडणवीस यांचे मेहतांशी असलेले जवळचे संबंध तसेच राज्यातील सत्ता हातून गेल्याने आता जैन यांना दिलेला शब्द पाळला जाईल याबद्दल भाजपच्या गोटातूनच साशंकता व्यक्त होत आहे.
मेहतांना ओवळा माजिवडा मतदारसंघात काम करण्यास श्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याचे ऐकले होते. त्यांनी तेथे काम करण्यास माझी हरकत नाही. पण मीरा- भार्इंदर मतदारसंघात व पालिकेत भ्रष्टाचारी आणि दडपशाही प्रवृतींसोबत जाणार नसल्याचे जैन यांनी म्हटले आहे. शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.