घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी पालिका पुन्हा नेमणार सल्लागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:45+5:302021-03-17T04:41:45+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेला अद्यापही ओला कचऱ्यावर प्रक्रिया करता आलेली नाही. ओला आणि सुका कचरा वेगळा येत ...

The municipality will re-appoint a consultant for the implementation of solid waste management | घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी पालिका पुन्हा नेमणार सल्लागार

घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी पालिका पुन्हा नेमणार सल्लागार

Next

ठाणे : ठाणे महापालिकेला अद्यापही ओला कचऱ्यावर प्रक्रिया करता आलेली नाही. ओला आणि सुका कचरा वेगळा येत असला तरी महापालिकेकडून तो एकत्र करूनच डम्पिंगवर टाकला जात आहे. असे असतानाही घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ च्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि स्वच्छ सर्वेक्षणात ठाण्याचा क्रमांक सुधारण्यासाठी महापालिका पुन्हा दोन वर्षांसाठी सल्लागार नेमणार आहे. यासाठी ३ कोटी ३३ लाख ६४ हजार ९८० रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेसमोर मांडण्यात येणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला १ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट, वाहतूक, हाताळणी ही २०१६ च्या नियमाप्रमाणोच केली जाणे अपेक्षित आहे. शहरात निर्माण होणारा बांधकाम तोडफोड कचरा, जैववैद्यकीय कचरा, घातक कचरा, प्लास्टीक वेस्ट आदी कचऱ्याचे कायद्यातील तरतुदीनुसार व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

शासनाकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा राबविण्यात येत असते. याची जबाबदारी मे. ईरनेस्ट ॲण्ड यंग या संस्थेकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी केलेल्या कामामुळे महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक सुधारल्याचा दावा पालिकेने केला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये घनकचरा व्यवस्थापनाविषयी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे गरेजेचे असते. त्यानुसार पहिला अहवाल तयार करण्यात येऊन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तर दुसऱ्या अहवालाचे कामही याच संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. ते कामदेखील समाधानकारक केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शहरातील तलाव, उद्याने यांचादेखील समतोल राखणे गरजेचे असून त्याचे कामही या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. एकूणच या सर्व बाबींचा विचार करून याच संस्थेला आता पुढील दोन वर्षांसाठी सल्लागाराचे काम देण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी ३३ लाख ६४ हजार ९८० रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

Web Title: The municipality will re-appoint a consultant for the implementation of solid waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.