शेल्टर होमसाठी जुन्या शाळांचा पालिका घेणार शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:37+5:302021-03-16T04:40:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रस्त्यावर, चौकात किंवा रेल्वेतील भिक्षुकांसाठी शेल्टर होमची संकल्पना पुढे आणली गेली आहे. ठाण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्त्यावर, चौकात किंवा रेल्वेतील भिक्षुकांसाठी शेल्टर होमची संकल्पना पुढे आणली गेली आहे. ठाण्यात पालिकेने काही ठिकाणी शेल्टर होम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अनेक लोकप्रतिनिधींनी आमच्या प्रभागात शेल्टर होम नको म्हणून नाके मुरडली होती. त्यामुळे पालिकेला शहरात एकच शेल्टर होम सुरू करता आलेले आहे. यावर उपाय म्हणून आता पालिकेने शहरातील जुन्या शाळांमध्ये अशा प्रकारे शेल्टर होम सुरू करता येऊ शकते का, याचा सर्व्हे सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला २५ लाखांच्या घरात आहे. २०११ मध्ये ठाण्याची लोकसंख्या १८ लाखांच्या घरात होती. त्यानुसार एक लाख लोखसंख्येमागे एक याप्रमाणे शहरात १८ शेल्टर होम असणे गरजेचे आहे. परंतु, महापालिका हद्दीत सध्याच्या घडीला एकच शेल्टर होम सुरू असून, ते नौपाडा भागात आहे. दरम्यान, पालिकेने २०१८ मध्ये केलेल्या सर्व्हेत शहरात १५८ भिकारी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अद्यापही नव्याने सर्व्हे झालेला नाही. सध्या महापालिकेच्या एकमेव शेल्टर होममध्ये २० भिक्षुक वास्तव्यास आहेत.
शहरात फिरणाऱ्या भिक्षुकांसाठी रात्रीचा निवारा असावा, या उद्देशाने शेल्टर होमची संकल्पना केंद्र सरकारकडून पुढे आली आहे. त्यानुसार पालिकेने ती शहरात राबविण्याचा प्रयत्नदेखील केला होता. परंतु, आमच्या भागात शेल्टर होम नको, आम्ही त्यांना सहन करणार नाही, असे म्हणत अनेक लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत शेल्टर होमसाठी नवा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील जुन्या शाळांमध्ये अशा प्रकारे शेल्टर होम सुरू करता येऊ शकतात, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी शहरात किती जुन्या शाळा आहेत, त्यांची माहिती शहर विकास आणि स्थावर मालमत्ता विभागाकडून घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली.