पालिका जागावाटप सोडत प्रक्रिया लवकरच राबवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:55 AM2020-01-11T00:55:40+5:302020-01-11T00:55:45+5:30

राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत डोंबिवलीमधील फेरीवाल्यांसाठी सोडतीद्वारे जागांचे वाटप झाले आहे.

The municipality will start the process of releasing the space soon | पालिका जागावाटप सोडत प्रक्रिया लवकरच राबवणार

पालिका जागावाटप सोडत प्रक्रिया लवकरच राबवणार

Next

कल्याण : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत डोंबिवलीमधील फेरीवाल्यांसाठी सोडतीद्वारे जागांचे वाटप झाले आहे. मात्र, कल्याणमधील फेरीवाले अद्याप ‘सोडती’च्या प्रतीक्षेत होते. त्यांनाही लवकरच हक्काची जागा मिळणार आहे. कल्याणच्या सोडतीच्या प्रक्रियेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी त्यांच्या दालनात विशेष बैठक बोलावली आहे. जानेवारी महिन्यातच सोडतीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केडीएमसीने २०१४ मध्ये शहर फेरीवाला समिती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात एकूण नऊ हजार ५३१ फेरीवाले आढळून आले होते. या सर्वेक्षणानंतर मार्च २०१८ मध्ये जाहीर आवाहन करून सर्वेक्षणात आढळलेल्या फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. शहरामधील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले असावेत, असे धोरण आहे. ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागांतील सोडत पार पडल्यानंतर कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील ‘क’ आणि ‘ड’ प्रभागांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. आयुक्त बोडके प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्याने त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर, बोडके महापालिकेत आल्यानंतर त्यांनी लवकरच कार्यवाही होईल, असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. शहर फेरीवाला समितीमधील सदस्य तथा फेरीवाला संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी नुकतीच आयुक्तांची भेट घेऊन कल्याणची सोडत प्रक्रिया लवकर राबवून येथील फेरीवाल्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार, आयुक्तांनी मंगळवारी शहर फेरीवाला समिती आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली आहे. यात सोडतीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
>डोंबिवलीत अंमलबजावणीमध्ये खोडा
१३ नोव्हेंबरला केडीएमसीने पहिल्या टप्प्यात डोंबिवलीतील ‘फ’ प्रभागातील ५०३ व ‘ग’ प्रभागातील ४१० फेरीवाल्यांना पाच शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीद्वारे जागांचे वाटप केले होते. काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची रस्त्यांची कामे सुरू असल्याने त्याच्या अंमलबजावणीला खोडा बसला आहे. काही नगरसेवकांनीही या प्रक्रियेला विरोध केला आहे. महासभेच्या सूचनेनुसार अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. संबंधितांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
>कल्याणच्या फेरीवाला सोडत प्रक्रियेसंदर्भात मंगळवारी आयुक्तांनी बैठक बोलाविली आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांत कल्याणमधील सोडतीची प्रक्रिया होईल.
- लक्ष्मण पाटील, उपायुक्त, फेरीवाला अतिक्रमण नियंत्रण विभाग

Web Title: The municipality will start the process of releasing the space soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.