लोकसभेच्या लग्नाच्या मांडवात ‘कोकण पदवीधर’चीही ‘मुंज’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:00 AM2024-05-09T10:00:21+5:302024-05-09T10:00:31+5:30

महायुती, मविआत अनेकांचे गुडघ्याला बाशिंग : एकास एक उमेदवार देण्यात यश येण्याबाबत साशंकता

'Munj' of 'Kokan graduate' in Lok Sabha marriage | लोकसभेच्या लग्नाच्या मांडवात ‘कोकण पदवीधर’चीही ‘मुंज’

लोकसभेच्या लग्नाच्या मांडवात ‘कोकण पदवीधर’चीही ‘मुंज’

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ठाण्यात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार निरंजन डावखरे भाजपकडून पुन्हा रिंगणात उतरणार, हे निश्चित मानले जाते. ठाण्यात शिंदेसेना, अजित पवार गट आणि उद्धवसेनेने निवडणुकीची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढत असल्याने कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधील पक्ष डावखरे यांना पाठिंबा देणार का, अशी चर्चा सुरू आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यापूर्वी २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळेस भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील आपले नशीब अजमावले होते. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. त्यात भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय तर शिवसेनेचे संजय मोरे यांचा पराभव झाला. 

आता कोकण पदवीधरसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. नव्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट, शरद पवार गट, काँग्रेस, उद्धवसेनेकडूनही मोर्चे बांधणी सुरू झाली. या निवडणुकीसाठी भाजपपाठोपाठ शिंदेसेना आणि अजित पवार गटाकडून दावा केला गेला. या निवडणुकीत शिंदेसेना आणि अजित पवार गट भाजपसाठी काम करेल, अशी शक्यता आहे. 

महाविकास आघाडीत आता लोकसभा निवडणुकीबाबत एकमत झाले आहे; परंतु कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हेच एकमत कायम राहील का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्धवसेनेकडून संजय घाडीगावकर, वरुण सरदेसाई, विजय कदम हे इच्छुक आहेत, तर शरद पवार गटाकडून अमित सरय्या यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून मतदार नोंदणी सुरू आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कोण लढणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
 

Web Title: 'Munj' of 'Kokan graduate' in Lok Sabha marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.