मुरबाड-म्हसा-कर्जत महामार्ग मृत्यूचा सापळा, नागरिक संतप्त : अधिकाºयांना दगडगोट्यांचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:47 AM2017-10-12T01:47:23+5:302017-10-12T01:47:33+5:30
मुरबाड-कर्जत-पुणे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ते अत्यंत हळू होत असून कामाचा दर्जादेखील निकृष्ट आहे.
मुरबाड : मुरबाड-कर्जत-पुणे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ते अत्यंत हळू होत असून कामाचा दर्जादेखील निकृष्ट आहे. त्यामुळेच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे वारंवार अपघात होतात. या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरू असल्याने संतप्त नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील दगडगोट्यांचा आहेर अधिकाºयांना देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
पुणे-मुरबाड-नाशिक या मार्गाचे शासनाने राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सुमारे २०० कोटी रु पये बांधकाम विभागाकडे वर्गदेखील केले. परंतु, तीन वर्षांपासून हे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून रस्त्यावरील चढउताराचे सपाटीकरण करण्याचे आदेश असताना बांधकाम विभाग ठेकेदाराच्या संगनमताने हे सपाटीकरण करण्याचे टाळत आहे. शिवाय, जुना डांबरी रस्ता उखडून त्याखालील मातीभराव काढून खडीकरण करणे, हे अंदाजपत्रकात असताना साजईफाटा ते शिरवलीदरम्यान आणि म्हसा ते बाटलीचीवाडीदरम्यान काही ठिकाणी ठेकेदाराने जुना डांबरी रस्ता उखडून न टाकता त्याच रस्त्यावर डांबरीकरण केले आहे. मात्र, नव्याने डांबरीकरण केलेला हा रस्ता सर्वत्र उखडला असून त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वेगात असलेल्या वाहनचालकांना दिवसा किंवा रात्री या खड्ड्यांचा अंदाज येत नसून जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागते आहे.
मुरबाड-म्हसा या मार्गाच्या निकृष्ट कामाची गुणनियंत्रण तसेच दक्षता विभागामार्फत चौकशी करून दोषी अधिकारी तसेच ठेकेदारावर कारवाई करावी. मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्वरित भरावे, यासाठी हजारो नागरिक सासणे येथे महामार्गावर रास्ता रोको करून खड्ड्यांतील दगडगोटेच आहेर म्हणून देणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.