मुरबाड पंचायत समितीच्या इमारतीला लागली गळती; नवीन फर्निचर पाण्यात भिजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:29 AM2020-08-24T02:29:02+5:302020-08-24T02:29:25+5:30
चार वर्षांपूर्वीचे बांधकाम
मुरबाड : चार वर्षांपूर्वी कोट्यवधी खर्च करून बांधलेल्या मुरबाड पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागल्याने नवीन फर्निचर भिजून सडण्याच्या मार्गावर आहे. हे फर्निचर चांगल्या ठिकाणी हलवण्याची तसदीही घेतली जात नसल्यामुळे पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मुरबाड पंचायत समितीच्या जुन्या दुमजली इमारतीत सर्व खात्यांना जागा अपुरी पडत असल्याने तीन ते चार कोटी खर्च करून ग्रामीण रु ग्णालयाची जुनी इमारत पाडून तेथे आरसीसी पद्धतीची चार वर्षांपूर्वी पंचायत समिती इमारत बांधण्यात आली. मात्र, नवीन बांधकामाचा आराखडा नियोजनबद्ध न केल्याने ज्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधकाम केले, तो विभाग व पाटबंधारे विभाग यांना नवीन इमारतीत जागाच उरली नसल्याने या विभागांची कार्यालये जुन्याच नादुरु स्त इमारतीत ठेवण्याची वेळ पंचायत समितीवर आली आहे. तसेच नवीन इमारतीचे बांधकाम सुमार दर्जाचे झाले आहे. बांधकाम सुरू असतानाच गॅलरीचा भाग कोसळला होता. इमारतीला अनेक तडे गेले आहेत. आता संपूर्ण इमारतीला गळती लागल्याने शांतारामभाऊ घोलप सभागृहातील लाखोंचे नवीन फर्निचर पाण्यात भिजले आहे. पहिल्या माळ्यावर तळे साचल्याने व वरील स्लॅबला जागोजागी भेगा पडल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहेत. या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. इमारतीला गळती लागल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी मान्य करून दुरुस्तीसाठी १० लाखांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याचे सांगितले.
इमारतीचे बांधकाम मी येण्याआधी झालेले असून स्लॅबगळती थांबवण्यासाठी वर पत्र्यांचे शेड बांधले जाईल. यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाला की, कामाला सुरुवात करण्यात येईल. - संदीप चव्हाण, उपविभागीय अभियंता, बांधकाम (जि.प.) उपविभाग, मुरबाड