मुरबाड अव्वल; ठाणे पाचवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:48 AM2018-05-31T00:48:04+5:302018-05-31T00:48:04+5:30
ठाणे जिल्ह्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८५.५६ टक्के लागला असून, या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात मुरबाड अव्वल ठरले
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८५.५६ टक्के लागला असून, या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात मुरबाड अव्वल ठरले असून, ठाणे पाचव्या क्रमांकावर आहे.
जिल्ह्यात ८१.४१ टक्के मुले, तर ९०.४२ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा एकूण निकाल सुमारे तीन टक्क्यांनी घसरला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातर्फे (एचएससी) फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्यातून यंदा ९४,०७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९४,००७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर त्यातील एकूण ८०,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ३९,१७१ मुली असून ४१,२६२ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल ३६.९३ टक्के लागला आहे. एकूण ५,२९४ रिपिटर्स विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १,९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रिपिटर्स विद्यार्थ्यांमध्येही सर्वाधिक म्हणजे ३९.०२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असल्या तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालातही यावर्षी घट झाली आहे.
जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९४.१४ टक्के असून कला शाखेचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७७.२५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८८.४६, तर व्यावसायाभिमुख शाखेचा निकाल ९१.७६ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ३८११ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ८,९६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२,६७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ८३३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील ४३५ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २,७८५ विद्यार्थ्यांना प्रथम, ६,६१५ विद्यार्थ्यांना द्वितीय तर १,३०१ विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे. वाणिज्य शाखेतील ४,८५२ विद्यार्थी विशेष, १३,८७९ विद्यार्थी प्रथम, १७,९१७ विद्यार्थी द्वितीय, ३५२२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर व्यावसायाभिमुख शाखेच्या निकालातही ७१ विद्यार्थी विशेष, ४२४ विद्यार्थी प्रथम, ३८३ विद्यार्थी द्वितीय, तर १३ विद्यार्थी पास श्रेणी मिळवण्यात यशस्वी झाले.
ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९२.४७ टक्के, तर सर्वात कमी म्हणजे ७९.९५ टक्के निकाल भिवंडी तालुक्याचा लागला आहे.
ठाणे जिल्ह्यांतर्गत सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यांचा समावेश होतो. यातील मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक असून त्याखालोखाल शहापूर तालुक्याचा निकाल ९०.७९ टक्के आहे. तिसरा क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राने पटकावला असून त्याचा निकाल ९०.५४ टक्के इतका आहे. उल्हासनगर महापालिका चौथ्या स्थानी असून त्यांचा निकाल ९०.०४ टक्के आहे. पाचव्या क्रमांकावर ठाणे महानगरपालिका, सहाव्या क्रमांकावर अंबरनाथ, तर सातव्या क्रमांकावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तालुका आहे. त्यांची टक्केवारी अनुक्रमे ८८.७९ टक्के, ८७.६३ टक्के आणि ८७.४६ टक्के आहे. आठव्या क्रमांकावर भार्इंदर महानगरपालिका विभाग असून त्याचा निकाल ८७.१५ टक्के आहे. नवव्या क्रमांकावर असलेल्या भिवंडी महानगरपालिका विभागाचा निकाल ८६.६४ टक्के, तर दहाव्या क्रमांकावरील कल्याण ग्रामीण विभागाचा निकाल ८४.५४ टक्के लागला आहे. तालुकानिहाय टक्केवारी पाहता जिल्ह्यातील अकराही तालुक्यांतून उत्तीर्णांमध्ये मुलींचीच संख्या जास्त आहे.
ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच महाविद्यालयांच्या एकूण निकालाकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. यंदा कल्याण ग्रामीण तालुक्यातील एक, अंबरनाथ तालुक्यातील तीन, शहापूर तालुक्यातील एक, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील १०, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सात, मीरा-भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील तीन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पाच, उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील दोन आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील तीन कनिष्ठ महाविद्यालये असे मिळून ३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी १०० टक्के यश मिळवले आहे. मात्र, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांतील एकाही महाविद्यालयाला १०० टक्के यश मिळवता आलेले नाही.
धाकधूक
आणि आनंद
बारावी परीक्षेचा निकाल हा करिअरचा टर्निंग पॉइंट असतो. त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागले असते. किती गुण मिळणार, याविषयी निकालापूर्वी धाकधूक असते आणि अपेक्षित निकाल लागताच विद्यार्थ्यांचा आनंद अशीच उंच उडी घेतो.