मुरबाड रेल्वेलाही ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:40 AM2018-05-15T03:40:53+5:302018-05-15T03:40:53+5:30

खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुरबाड येथे दीड वर्षापूर्वी कल्याणहून मुरबाडमार्गे नगर रेल्वेची घोषणा केली. त्यानंतर कल्याण-मुरबाड मार्गाचे फक्त सर्वेक्षण झाले.

Murbad will also run the railway | मुरबाड रेल्वेलाही ठेंगा

मुरबाड रेल्वेलाही ठेंगा

Next

मुरलीधर भवार 
कल्याण : खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुरबाड येथे दीड वर्षापूर्वी कल्याणहून मुरबाडमार्गे नगर रेल्वेची घोषणा केली. त्यानंतर कल्याण-मुरबाड मार्गाचे फक्त सर्वेक्षण झाले. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही न केल्याने ही रेल्वे बासनात गुंडाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. टिटवाळामार्गे ही रेल्वे नेण्याचा प्रस्ताव आहे.
या रेल्वेमार्गाचे घोंगडे दीर्घकाळ भिजत पडले आहे. मुरबाडच्या सरकारी जत्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेसाठीचा ५० टक्के खर्च राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यांनी फक्त कल्याण-मुरबाड मार्गाचा उल्लेख केला नव्हता, तर मुरबाडमार्गे नगर रेल्वेचा उल्लेख होता. त्यासाठी १००, ५०० किंवा एक हजार कोटी रुपये लागले तरी चालतील. त्याचा निम्मा खर्च राज्य सरकारकडून दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्याविषयी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी ते स्वत: चर्चा करणार होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वे अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड रेल्वे सर्वेक्षणासाठी दोन कोटींची तरतूद केली होती. पण त्यानंतर फक्त सर्वेक्षण झाले. यंदाच्या अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्राने तरतूद न केल्याने राज्याकडूनही त्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.
याबाबत कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी महासंघाचे पदाधिकारी मनोहर शेलार म्हणाले, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग ही केवळ घोषणा ठरु नये. हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नगरपर्यंत नाही, किमान कल्याण-मुरबाडचा मार्ग तरी आश्वासनानुसार पूर्ण व्हायला हवा. पण ते कामही सर्वेक्षणावरच अडले आहे. सध्या कल्याण-नगर रेल्वेमार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याच्या बातम्या नगर जिल्ह्यातून प्रसारित होऊ लागल्याने खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले,कल्याण ते नगर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. येत्या तीन महिन्यात ते सुरू होणे अपेक्षित आहे. सध्या पुणे-नाशिक मार्गाचे सर्वेक्षण झालेले आहे.
कल्याण- नगर रेल्वेमार्गासाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे दिनेश हुलावळे यांच्याकडे विचारणा केली असता, यापूर्वी दोन-तीन वेळा सर्वेक्षण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचा काही उपयोग झालेला नाही. यातील एका अहवालानुसार कल्याण माळशेजमार्गे नगर रेल्वेमार्ग व्हावा, असा सकारात्मक अहवाल आला आहे. मात्र अशा अहवालांवर पुढे काही होत नाही. त्यामुळे आता सर्वेक्षण झाले किंवा आणखी तीन महिन्यांनी होणार असले, तरी त्यावर काय बोलणार? खरोखर सर्वेक्षण होणार असेल, तर ती चांगली बाब आहे.
>काय फिरतोय मेसेज?
कल्याण-माळशेजमार्गे नगर या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यावर २६ स्थानके असतील. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कांबा रोड, आपटी, पाटगाव, मुरबाड, राव, दाहेरी मिल्हे, नागातार केबीन, वारीवघर केबीन, देवरुखवाडी, मढ केबीन, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, मालवाडी, कोठाडेवाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोत्रे, भाळवणी आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके त्यावर असतील, असा तपशील दिला जातो आहे. मूळात कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा, मुरबाड असा मार्ग सध्या प्रस्तावित असताना या मेसेजमध्ये अंबरनाथमार्गे सर्वेक्षण झाल्याचे म्हटले आहे. त्यावर रेल्वेचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
‘कथोरे भाजपा सोडा’ : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची बातमी सोशल मीडियावर अपलोड झाली आहे. त्यावर ज्या कमेंट आल्या आहेत, त्यात या मार्गासाठी आग्रह धरणाऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यात- कधी येणार रेल्वे, खोटारडे सरकार, कथोरे भाजपा सोडा, भाजपाशी बांधील राहू नका, कुठे गेली रेल्वे? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

Web Title: Murbad will also run the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.