खून प्रकरणात १६ आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:22 AM2018-03-08T05:22:00+5:302018-03-08T05:22:00+5:30
जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे.
ठाणे - जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे.
कल्याणमधील उंबर्डे येथील विकास पाटील (३२) यांचा ३ आॅक्टोबर २०१२ रोजी खून झाला होता. विकासचे काका रघुनाथ पाटील आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी काका शंकर पाटील यांच्यात घटनेच्या सात वर्षे आधीपासून जागेचा वाद होता. कल्याणच्या खाडीकिनारी रघुनाथ पाटील यांनी जमीन विकत घेतली होती. ती आपली असल्याचा आरोपीचा दावा होता. यावरून काका पाटील आणि रघुनाथ पाटील यांच्यात वेळोवेळी भांडणे व्हायची. विकासचा भाऊ विलास मध्यस्थी करून भांडणे सोडवायचा. २०१० पासून हा वाद वाढला. या वादातून आरोपींनी विकास पाटीलवर तीनचार वेळा हल्ला केला. आरोपी त्याच्या पत्नीलाही त्रास द्यायचे. याप्रकरणी विकास पाटील यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.
विकास पाटील एका दारूच्या दुकानावर व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. ३ आॅक्टोबर २०१२ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ते दुकानाचे शटर उघडत असताना आरोपी दोन वाहनांमध्ये आले. त्यांनी तलवारी, गुप्ती आणि चॉपरने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपींनी लगेच एका फार्महाउसकडे पळ काढला. वाटेत भातसा नदीमध्ये त्यांनी मोबाइल फोन आणि शस्त्रे फेकून दिली. त्यानंतर, एका फार्महाउसमध्ये गाड्या आणि कपडे लपवले. बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींनी वापरलेल्या दोन्ही गाड्या हस्तगत केल्या. खुनाच्यावेळी आरोपींनी घातलेले कपडेही पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत केले. मृतक विकासचे रक्त आणि आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग एकच असल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले.
कल्याण सत्र न्यायालयात न्या. एन.एम. वाघमारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी एकूण २१ साक्षीदार तपासले. खुनाच्या वेळी एक आइस्क्रीम विक्रेता आणि एक रिक्षाचालक घटनास्थळी होता. दोघेही घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. याशिवाय, विकास यांची पत्नी किशोरी यांनी न्यायालयासमोर संपूर्ण घटनाक्रम विशद केला. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले.
सर्व आरोपी उंबर्डे येथील
या प्रकरणातील सर्व आरोपी कल्याणजवळच्या उंबर्डे येथील रहिवासी आहेत. आरोपींना घटनेनंतर लगेच पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. उच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळाला नव्हता.
आरोपींमध्ये काका शंकर पाटील, त्यांची मुले संदीप आणि अनिल, बळीराम गजानन पाटील, त्यांची मुले प्रदीप, भरत आणि शरद, यशवंत बळीराम पाटील, त्यांचा मुलगा भगवान आणि उमेश यांच्यासह संजय लहू कारभारी आणि कबीर लहू कारभारी या दोन भावांचाही समावेश आहे. याशिवाय, रणशुल ऊर्फ रणशहा चंद्रकांत पाटील, किसन काळू पाटील, मधुकर रामचंद्र पाटील आणि मिनेश नानू पाटील यांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१६ आरोपींच्या जन्मठेपेचे दुसरे प्रकरण
डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००८ साली क्रिकेटच्या वादातून एका युवकाचा खून झाला होता. या प्रकरणाचा निकाल २०१२ साली लागला. त्यावेळी कल्याण न्यायालयाने या प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणाची सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी मांडली होती. त्यानंतर, एकाच वेळी १६ आरोपींना जन्मठेप होण्याचे हे दुसरे प्रकरण आहे.
छातीत चॉपरचा तुकडा : घटनेच्या दिवशी आरोपींनी विकास पाटील याच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. एकाच वेळी सर्व आरोपींनी तलवारी, गुप्त्या आणि चॉपरने विकासवर वार केले. हा खून एवढा भीषण होता की, विकासची मान जवळपास धडावेगळी झाली होती. विकासच्या छातीमध्ये चॉपरचा एक तुकडाही राहिला होता. शवचिकित्सेनंतर डॉक्टरांनी तो बाहेर काढला होता.