नगरसेवकाच्या मुलाचा खून: सावत्र भावाच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:39 AM2020-10-06T00:39:16+5:302020-10-06T00:43:10+5:30
ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेशच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन पाटील याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करयाचे आदेश ठाणे न्यायालयाने रविवारी दिले. संपत्तीच्या वादातून सचिन या सावत्र भावाने राकेशची साथीदाराच्या मदतीने गोळया झाडून हत्या केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : संपत्तीच्या वादातून ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेशच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन पाटील याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करयाचे आदेश ठाणे न्यायालयाने रविवारी दिले. त्याचा साथीदार गौरव सिंग याची मात्र न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सचिन याने संपत्तीच्या हव्यासापोटी त्याचा सावत्र भाऊ राकेशवर गोळी झाडून २० सप्टेंबर रोजी गौरव सिंग या साथीदाराच्या मदतीने हत्या केली होती. हत्येनंतर राकेशचा मृतदेह वाशी येथील खाडीत फेकला होता. दरम्यान, हत्येनंतर पसार झालेल्या सचिनला नवी मुंबईतील उलवे येथून कासारवडवली पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याआधी गौरवला अटक झाली होती. गौरवकडून मोटारसायकल तर सचिनकडून खूनातील गावठी कट्टा आणि तीन किलो ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. मात्र, सचिनने ज्या कटरने घरातील तिजोरी कापली ते कटर, राकेशचा मृतदेह खाडीपर्यंत नेण्यासाठी वापरलेले वाहन तसेच खाडीत फेकलेला मृतदेह अद्याप न मिळाल्याने सचिनच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी कासारवडवली पोलिसांनी ठाणे न्यायालयाकडे केली. त्याच्या कोठडीची मुदत ४ आॅक्टोबर रोजी संपली. त्यानंतर त्याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. तर गौरव सिंग याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.