खूनासह दरोडा टाकणारी टोळी जेरबंद: ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:27 PM2019-03-11T21:27:21+5:302019-03-11T21:41:48+5:30
सिमेंटचे ब्लॉक लुटण्यासाठी आलेल्या एका टोळीने आधी ट्रक चालकाकडे लिफ्ट मागितली. तो ओळखीचा निघाल्यामुळे दरोडयाचे बिंग फुटू नये म्हणून त्याचाच खून करुन पलायन केले होते. ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने या पाचही जणाच्या मोठया कौशल्याने मुसक्या आवळल्या आहेत.
ठाणे: भिवंडी येथे गुजरातच्या उमरगा येथील बिग ब्लॉक कंपनीच्या ट्रकचा चालक सुभाष यादव (३५, रा. उत्तरप्रदेश)याचा खून करुन त्यातील ६४ हजारांचे सिमेंटच्या ब्लॉकच्या मालावर दरोडा टाकून पसार झालेल्या इम्रान खान (३५, रा. भिवंडी) याच्यासह पाच जणांना ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली. खूनासाठी वापरलेला चाकू, टॉमी या हत्यारांसह दरोडयातील मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत केला आहे.
भिवंडीतील गंगारामपाडा, वडपे याठिकाणी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास गुजरातच्या ऊमरगा येथील ‘बिग ब्लॉक’ कंपनीचा ट्रक बेवारसपणे उभा असलेला आढळला. याच ट्रकमध्ये चालक सुभाष याचा क्लीनर सीटवर मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यात हत्याराने वार करुन अज्ञात व्यक्तीने खून त्याचा खून केला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात खून आणि दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक डॉ. राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे समांतर तपासासाठी हे प्रकरण सोपविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, अविनाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांच्या पथकाने याप्रकरणी महार्गावरील अनेक ढाबे, हॉटेल तसेच वाहन चालकांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही फूटेज आणि संबंधित ट्रकच्या जीपीएस यंत्रणेच्या आधारे तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद अजमल शेख (३६, रा. तलासरी, पालघर) याला ९ मार्च रोजी ताब्यात घेतले. याच्याच चौकशीमध्ये दरोडयासाठी यातील सूत्रधार इम्रानच्या इशाऱ्यावरुन यादवचा खून करुन माल लुटल्याची कबूली त्याने तपास पथकाला दिली. त्याच माहितीच्या आधारे मोहम्मद शाकीररियाज शेख (३०, रा. गोवंडी, मुंबई), जहानजेब खान (२३, रा. गैबिनगर, भिवंडी), इम्रान खान (३५, रा. भिवंडी), आणि कैफ शेख (३३, रा. भिवंडी) या चौघांसह पाच जणांना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर यांनी अटक केली. सखोल चौकशीमध्ये कैफ अहमद शेख याने त्यांना दहा हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन सिमेंट ब्लॉक आणण्यास सांगितले होते. आता असे सिमेंट ब्लॉक आणण्यासाठी ही टोळी एखादे सावज हेरत होती. त्याचवेळी गुजरात ते खोपोलीला सिमेंटचे ब्लॉक घेऊन निघालेला यादवचा ट्रक त्यांना रस्त्यावरून जातांना दिसला. याच ट्रकमध्ये शाकीर आणि अजमल हे दोघे तलासरी पेट्रोल पंप येथून बसले. योगायोगाने शाकीर आणि यादव हे एकाच कंपनीतील असल्यामुळे त्यांची ओळखही निघाली. ते मनोरच्या माऊंटन हॉटेलपर्यंत त्याच्यासमवेत आले. खानिवडे येथील आगरी कट्टा या ढाब्यावर लघुशंकेच्या बहाण्याने त्यांनी हा ट्रक थांबविला.
ट्रकमधधील ९१५ नग असलेले सिमेंटचे ब्लॉकचा माल त्यांना लुटायचा असल्याने त्यांनी यादव लघुशंका करुन गाडीमध्ये चढत असतांनाच दोघांपैकी एकाने त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमीने प्रहार केला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्याचा मृतदेह क्लिनरच्या सीटवर ठेवून ट्रकमधील सिमेंटचे ब्लॉक उतरवून घेतले. नंतर ट्रक शांग्रीला रिसॉर्ट येथे उभा करुन ते पसार झाले. ट्रकमधील सिमेंटच्या ब्लॉकची चोरी करायची होती. पण, यादवची ओळख निघाल्यामुळे तो आपले बिंग फोडेल, या भीतीने त्यांनी त्याचाही खून केल्याची कबूली दिली. या टोळीपैकी शाकीररियाज याच्यावर उत्तरप्रदेशमध्ये जबरी चोरीचा फेब्रुवारी २०१९ मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या इतर साथीदारांवरही असे गुन्हे दाखल आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे. सर्व आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.