‘स्फोटक’ कारसह हत्येची गुंतागुंत वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 02:36 AM2021-03-11T02:36:09+5:302021-03-11T02:37:04+5:30
पंधरवड्यानंतरही ठोस माहिती नाहीच; अंबानींच्या निवासस्थानाजवळ सापडली हाेती स्काॅर्पिओ
जमीर काझी
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानापासून काही अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार सापडली हाेती. या घटनेला गुरुवारी पंधरवडा होत असला तरी त्यामागील उलगडा अद्याप झालेला नाही. कारची चोरी करून जिलेटिनच्या कांड्या व धमकीचे पत्र ठेवणारे कोण, याबद्दल तपास यंत्रणेच्या हाती ठोस माहिती लागलेली नाही. उलट रोज नवीन माहिती समोर येत असल्याने तपासातील गुंतागुंत वाढली आहे.
कारचे मालक मनसुख हिरेन यांच्यापूर्वी ती सॅम न्यूटन नावाच्या व्यक्तीची होती. ३ वर्षांपूर्वी त्यांच्याकडून हिरेन यांनी ती घेतल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूचा नेमका उलगडा झाल्यास मुख्य आरोपीचा छडा लागण्यास मदत होईल.
२५ फेब्रुवारीला अँटिलिया बंगल्यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या स्कॉर्पिओमध्ये २० जिलेटिनच्या कांड्या, धमकीचे पत्र व अनेक नंबरप्लेट्स सापडल्या होत्या. त्याबाबत क्राइम ब्रँचने केलेल्या तपासात ती चोरीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मालक मनसुख हिरेन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी २०१८ मध्ये सॅम न्यूटन यांनी ही गाडी त्यांना दिल्याचे समाेर आले. स्कॉर्पिओ दुरुस्तीसाठी दिली असता त्याचे १ लाख ७५ हजारांचे बिल न्यूटन यांनी दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी ती आपल्याकडेच ठेवून घेतल्याचा जबाब हिरेन यांनी दिला हाेता. ७ फेब्रुवारीला ती चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर गाडीचे रहस्य सुटण्याची अपेक्षा असताना हिरेन बेपत्ता होऊन त्यांचा मृतदेह आढळला.
हिरेन यांच्या पत्नीने एपीआय सचिन वाझे यांनीच हत्या केल्याचा आरोप केला. ते पतीच्या काही वर्षांपासून संपर्कात होते आणि स्कॉर्पिओ सहा महिने त्यांनी वापरण्यासाठी घेतली होती, असा आरोपही केला. त्यामुळे वाझे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. त्यांच्याकडून एटीएसला सविस्तर माहिती मिळाल्यास हिरेन यांची हत्या, जिलेटिन कांड्या, स्कॉर्पिओ, इनोव्हाचे रहस्यही उलगडेल. मात्र, वेळकाढूपणा झाल्यास एनआयएकडून तपासाअंती मुंबई पोलीस व एटीएस तपासातील त्रुटी चव्हाट्यावर येऊ शकतील.
आज भूूमिका मांडणार; वाझे यांची प्रसारमाध्यमांना माहिती
मुंबई : हिरेन मृत्यू प्रकरणात आरोपांच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे
सचिन वाझे यांनी आपली भूमिका गुरुवारी मांडणार असल्याचे माध्यमांना सांगितले. हिरेन मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची विविध पथके तपास करत आहेत.
काही जण वाझे यांच्या मागावर असल्याचीही चर्चा आहे. बुधवाऱी वाझे यांनी माध्यमांना सांगितले की,
एक गाडी पोलीस स्टिकर लावून मागावर आहे. त्यानंतर त्या वाहनात एटीएसचे अधिकारी असल्याची चर्चा रंगली. वाझे यांची बुधवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत बैठक झाली. दिवसभरात दोन ते तीन वेळा ते आयुक्ताच्या दालनात गेले होते.
दरम्यान, मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांनी केलेल्या आरोपानुसार, अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्कॉर्पियो तीन महिने सचिन वाझेंकडे होती. याबाबत वाझेंनी थेट उत्तर दिले नाही. स्कॉर्पिओ आणि वाझे कनेक्शनबाबत सहआयुक्त मिलिंद भारांबे यांच्याकडे विचारणा करताच, त्यांनी वाझे यांनी स्कॉर्पिओ त्यांच्याकडे होती याबाबत काही सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.
एनआयएचे मुंबईसह ठाण्यात छापे
nमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात मिळालेल्या ‘स्फोटक’ कारच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शोध मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, बुधवारी मुंबई व ठाण्यात विविध ठिकाणी छापे मारण्यात आले. दरम्यान, याबाबत अंबानी यांच्या खासगी सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी व त्या वेळी बंगल्यावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदविण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.
nजिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या कारचा वापर करणाऱ्याच्या शोधाच्या अनुषंगाने सर्व शक्यता पडताळून तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसने याबाबत जप्त केलेल्या वस्तू, सीसीटीव्ही फूटेज व अन्य पुरावे पथकाने ताब्यात घेतले आहेत. त्याबाबत फॉरेन्सिक पुरावे जमा केले जात आहेत.
nएनआयएच्या महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी तीन पथके बनविली आहेत. त्यांच्यावर आरोपींचा छडा लावण्यासाठी जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. त्यानुसार, अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियापासून ५०० मीटर अंतरावर स्कॉर्पिओ पार्क केलेल्या वेळेच्या दोन दिवसांपूर्वीपासून ते हे प्रकरण उघडकीस येईपर्यंतच्या कालावधीतील परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज पडताळण्याचे काम एक पथक करीत आहे.
एटीएसच्या पथकाकडून कॉल डिटेल्सवरून तपास सुरू
एटीएसच्या तपास पथकाकडून मनसुख हिरेन यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात येत आहेत. तसेच तपासासंबंधित सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि आतापर्यंतच्या घटनाक्रमाचा आढावाही एटीएसकडून घेण्यात येत आहे.