चैनीसाठी केला मित्राचा खून
By admin | Published: January 10, 2017 06:15 AM2017-01-10T06:15:04+5:302017-01-10T06:15:04+5:30
वांद्रे येथील प्रसिध्द मुन्ना पानवालाच्या मुलाच्या निर्घृण हत्येप्रकरणी दीड महिन्यांनी ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्या मित्रांनाच अटक केली आहे.
मीरा रोड : वांद्रे येथील प्रसिध्द मुन्ना पानवालाच्या मुलाच्या निर्घृण हत्येप्रकरणी दीड महिन्यांनी ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्या मित्रांनाच अटक केली आहे. मौजमजेसाठी त्यांनी वाढदिवसाच्या पार्टीवेळीच मित्राला ठेचून मारल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेविषयक मालिका पाहणाऱ्या या आरोपींनी आपला माग काढला जाऊ नये म्हणून मोबाईलचा वापर टाळला असला, तरी सीसीटीव्ही फुटेज आणि वेगवेगळ््या लोकांच्या चौकशीतून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. ठाणे न्यायालयाने सोमवारी त्यांना १६ जानेवारीपर्यंत कोठडी दिली आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत वेलकर पेट्रोलपंप आवारातील झुडपात एका तरुणाचा दगडाने डोके ठेचलेला मृतदेह २३ नोव्हेंबरला सापडला होता. चेहऱ्याची ओळख पटत नसली, तरी त्याच्या अंगावरील् गोंदवल्याच्या खुणांच्या वर्णनावरून तो शिवशंकर उर्फ निक्कू चौरसिया (२३, रा. कुंभारवाडा, ग्रँटरोड) याचा असल्याचे निष्पन्न झाले.
शिवशंकरच्या वडिलांची वांदे्र पश्चिमेस नंदी गल्लीत पानाची टपरी असुन ते मुन्ना पानवाला म्हणुन प्रसिध्द आहेत. २२ तारखेला वाढदिवसाच्या दिवशी याच टपरीवरून तो गेला आणि परत आला नव्हता. त्यामुळे वांद्रे पोलिस ठाण्यात वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फु टेज तपासले असता त्यात शिवशंकरसोबत अन्य तीन तरुण आढळले. पण त्यांना कोणी ओळखत नव्हते. पोलिसांनी विविध मार्गांनी तपास सुरु केला. शिवशंकरचा मोबाईल तपासला पण गुन्हेविषयक मालिका पाहिल्याने आरोपींनी त्याला त्या दिवशी मोबाईलवर संपर्क केला नसल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह काशिमाऱ्याला सापडल्याने याच चौकशीतून पोलिसांनी नालासोपाऱ्यातील कमलेश सहानी (२६) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर हत्या कटाचा उलगडा झाला आणि त्यात आणखी दोन आरोपी रुपेश साह (२५) व मंजू पटेल (३०, दोघेही रा. नरकटीयागंज, बिहार)सहभागी असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने दोघांनाही नेपाळच्या सीमेवरुन अटक केली.
रुपेशचा भाऊ संतोष हा शिवंशकरच्या पानाच्या गादीजवळील इमारतीत रखवालदार आहे. सुट्टीच्या दिवसात संतोषऐवजी रुपेश काम करायचा. त्यातून त्याची शिवशंकरशी ओळख झाली. त्याच्या अंगावर तीन सोन्याच्या चेन, दोन अंगठ्या, ब्रेसलेट पाहून त्याची नियत फिरली. २६ नोव्हेंबरला शिवशंकरचा वाढदिवस होता. त्याच्या खरेदीसाठी त्याने घरून १० हजार रुपये घेतले होते. वाढदिवसाची पार्टी करून म्हणून कमलेश, रुपेश, मंजू वांदे्र येथे आले. त्यांनी फोन न करताच शिवशंकरला गाठले. तेथे मद्यातून शिवशंकरला बेशुध्दीचे औषध पाजले. शुध्द हरपलेल्या शिवशंकरला त्यांनी टॅक्सीने थेट काशिमीरा येथील वेलकर पॅट्रोलपंपाजवळ नेले. दगडाने ठेचून त्याची हत्या केली. (प्रतिनिधी)