बेपत्ता असलेल्या कोपरीतील व्यक्तीची हत्या; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:23 AM2020-02-07T01:23:21+5:302020-02-07T01:23:39+5:30
बॅगेमध्ये आढळला मृतदेह
कल्याण : ठाणे येथील कोपरी परिसरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या उमेश पाटील (५६) यांचा मृतदेह डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळ परिसरात एका बॅगेत गुरुवारी सकाळी आढळून आला. पाटील यांच्या हत्येप्रकरणी प्रफुल्ल पवार (५७, रा. कोपर, डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी सायंकाळी कोपर येथून अटक केली.
बावनचाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह असल्याची माहिती गुरुवारी सकाळी एका रिक्षाचालकाने विष्णूनगर पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह त्यांना आढळला. याच दरम्यान, अशा प्रकारचे साम्य असलेली व्यक्ती दोन दिवसांपासून ठाणे येथून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी पाटील यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच डोंबिवलीत आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी पाटील यांच्या मृतदेहाची ओळख पटवली.
पाटील मंगळवारी सकाळी वाशी येथे कामाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. परंतु, रात्री परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाणे गाठत ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांचा शोध सुरू केला होता. याचदरम्यान, ते डोंबिवलीत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी डोंबिवलीत पाटील यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात स्टेनो टायपिस्ट होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ते कोपरी येथे पत्नी, एक मुलगा व एक मुलीसह राहत होते.
गळा दाबून केली हत्या, अवघ्या आठ तासांत गुन्ह्याची उकल
प्रफुल्ल पवार आणि उमेश पाटील यांची रेल्वे प्रवासात ओळख झाली होती. पाटील यांचे पवार यांच्या घरी येणेजाणे होते. पाटील यांच्याशी संबंध ठेवण्यास पवार हा टाळाटाळ करू लागला होता. ४ फेब्रुवारीला पवार याला भेटण्यासाठी पाटील त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी दोघांचे भांडण झाले. त्यातून पवार याने पाटील यांचा गळा दाबून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह बॅगेत भरून बावनचाळ येथे फेकून दिला.या घटनेची कबुली पवार याने दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने अवघ्या आठ तासांत या गुन्ह्याची उकल केली.