एकतर्फी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बापाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:40 PM2022-03-16T12:40:59+5:302022-03-16T12:45:02+5:30
भिवंडी तालुक्यात वाडा रस्त्यावरील कवाड गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारील मोकळ्या जागेत ९ मार्च रोजी एक मृतदेह आढळून आला.
भिवंडी : एकतर्फी प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या प्रियसीच्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाणे क्षेत्रातील कवाड येथे घडली. यामधील हत्या करणाऱ्या आरोपीस भिवंडी तालुका पोलिसांनी बिहार येथून अटक केली. कमलजीत वारीयम सांडे (वय ५५ रा. उल्हासनगर नंबर ५) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर पप्पू कुमार राजकिशोर साह (वय २६ रा. उल्हासनगर मूळ रा. चंपारण्य बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यात वाडा रस्त्यावरील कवाड गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारील मोकळ्या जागेत ९ मार्च रोजी एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा पंचनामा करून ओळख पाठविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा मृतदेह उल्हासनगर येथील कमलजीत वारीयम सांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून व बातमीदारांकडून माहिती घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो बिहार येथे पळून गेल्याचे समजले. त्यामुळे पोलीस पथकाने थेट बिहार गाठून पप्पू कुमार राजकिशोर साह यास ताब्यात घेऊन अटक केली. आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले. त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले. त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी दाभाडे यांनी दिली.