घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून; मुंब्य्रातील घटना, आरोपीस केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 01:15 PM2022-04-21T13:15:01+5:302022-04-21T13:15:30+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले.
मुंब्रा : दिव्यातील नागवाडी परिसरात राहत असलेल्या दशरथ काकडे याने त्याच्या घराजवळ थुंकणाऱ्या रुपेश गोळे या १३ वर्षांच्या मुलाचा राग आल्याने त्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले. तेथे गळा दाबून त्याचा खून केला. मयत मुलाचे वडील विजय यांनी याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून काकडे याला पोलिसांनी अटक केली.
दिवा पश्चिम येथील नागवाडी भागात रुपेश हा वडील विजय आणि आईसोबत राहत होता. त्याच्या शेजारी दशरथ हा राहत असून, तो रुपेशचा नातेवाईकही आहे. दिवा येथे सुरू असलेल्या गावदेवीच्या जत्रेला रुपेशला नेतो, असे विजय यांना खोटे सांगून दशरथ हा रुपेशला रविवारी दुपारी ३.३० वाजता घेऊन गेला होता. सायंकाळी दशरथ घरी परतला; परंतु त्याच्यासोबत रुपेश नव्हता. त्यामुळे विजय यांनी दशरथला रुपेशबद्दल विचारले असता, त्याने तो जत्रेत खेळत असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रुपेश घरी न आल्याने विजय यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दशरथला ताब्यात घेतले. त्यावेळी आपण रुपेशला घेऊन गेल्यानंतर त्याला फेरीवाल्याकडून कपडे खरेदी करून दिले आणि त्यानंतर जत्रेत नेले, असे सांगितले. दिव्यात केवळ सायंकाळीच बाजार भरतो; परंतु दशरथने रुपेशला दुपारी नेले होते, त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. सोमवारी पोलीस त्याला बाजारात घेऊन गेले, हे कपडे खरेदी केले, याबद्दल विचारले. त्यानंतर दशरथने एका फेरीवाल्याकडे नेले पण त्याने नकार दिला.
स्वच्छतागृहात मृतदेह
दिवा येथील एका निर्जनस्थळी ठाणे महापालिकेचे एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहात कोणीही फिरकत नाही. या स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले. त्याठिकाणी त्याचा गळा आवळून खून केला. मृतदेह तिथेच सोडून दशरथ हा घरी आला होता. सोमवारी पोलिसांनी रुपेशचा मृतदेह स्वच्छतागृहातून बाहेर काढला.