अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेची हत्या; अंगावर उकळते तूप टाकून घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:46 PM2022-05-06T16:46:56+5:302022-05-06T16:49:19+5:30
ठाणे : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गीता यादव (वय ३६) या महिलेने मनीषा पांडे (३०) हिच्या अंगावर उकळते ...
ठाणे : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गीता यादव (वय ३६) या महिलेने मनीषा पांडे (३०) हिच्या अंगावर उकळते तूप ओतून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच समोर आला. उपचारादरम्यान ६ मार्च २०२२ रोजी मुंबईतील रुग्णालयात मनीषाचा मृत्यू झाला. तिची आई मीरा खिरदेकर (६०, रा. साठेनगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
ठाण्यातील लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्याला होती. पतीशी वाद झाल्याने ज्ञानेश्वरनगर भागात गीता ही माहेरी राहायला होती. आपल्या पतीचे मनीषासोबत अनैतिक संबंध असल्याचा गीताला संशय होता. त्यामुळे काही दिवसांपासून वादही सुरू होते. मनीषा कामानिमित्ताने २३ जानेवारी २०२२ रोजी तिच्या माहेरी गेली होती. त्याचवेळी अचानक गीताने मनीषाला जेवण बनविण्यासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले. सहज बोलविले असेल, असा समज करून मनीषा तिच्या लोकमान्यनगर येथील घरी पोहोचली. मात्र, पतीसोबत हिचे अनैतिक संबंध असावेत, असा तिला संशय असल्याने घरात जेवण बनवित असताना गीताने उकळते तूप मनीषाच्या अंगावर ओतले. या घटनेत तिचा चेहरा, छाती, मान, पोट आणि पाय होरपळल्याने ती गंभीर जखमी झाली.
स्थानिकांनी तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईतील शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ६ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला शिव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर मनीषाची आई मीरा यांनी या प्रकरणात गीताविरुद्ध संशय व्यक्त करून १४ मार्च रोजी तक्रार दिली. त्याआधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला.
पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादू कुंभार आणि सहायक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांच्या पथकाने गीता आणि मनीषाचा पती यांच्यात मोबाइलवर झालेल्या संभाषणाची माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळविली. खुनाच्या घटनेनंतर गीता उत्तर प्रदेशात पसार झाली होती. तांत्रिक माहिती आणि मनीषाचा मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे गीताला ११ एप्रिल २०२२ ला अटक झाली.
... यामुळे घडले हत्याकांड
गीताचा पती हरेंद्रच्या सांगण्यावरूनच गीताने आपल्या अंगावर उकळते तेल टाकल्याचा जबाब तिने जखमी अवस्थेमध्ये दिला होता. त्यामुळे हरेंद्रलाही या खून प्रकरणात २७ एप्रिलला अटक झाली. गीतासह आपल्यालाही हरेंद्रने सांभाळले पाहिजे, असा तगादा मनीषाने हरेंद्रकडे लावला होता, अशी महत्त्वपूर्ण माहितीही पोलीस चौकशीत समोर आली. यातूनच हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले.