अनैतिक संबंध कायम ठेवण्यास विरोध करणाऱ्या तरुणीचा खून
By जितेंद्र कालेकर | Published: July 3, 2024 09:25 PM2024-07-03T21:25:05+5:302024-07-03T21:25:17+5:30
आरोपीस अटक : डायघर पोलिसांची कारवाई
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीचा खून करणाऱ्या मोहम्मद अली नासीर हुसेन शेख ऊर्फ ईशान (वय ३५ , रा. मुंब्रा) याला अटक केल्याची माहिती डायघर पोलिसांनी बुधवारी दिली. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मुंब्रा भागात राहणारा ईशान हा पुण्यातील एका मॉलमध्ये कामाला आहे. तो विवाहित असून, त्याला दोन मुलेही आहेत. त्याचे डायघर भागातील तरुणीशी काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. तिने यापुढे त्यांच्यातील प्रेमसंबंधाला नकार दिला होता. तो मात्र हे ‘संबंध’ कायम राहण्यासाठी आग्रही होता. यातूनच त्यांच्यात वाद सुरू होते. याचाच राग आल्याने त्याने २ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ६:३० च्या सुमारास तिचा ओढणीने गळा आवळून खून केला.
याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल राजपूत यांच्या पथकाने आरोपीला बुधवारी सकाळी अटक केली. या खुनामागे आणखी काही कारण आहे का ? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे डायघर पोलिसांनी सांगितले.