उल्हासनगरात सलून चालकाची हत्या, आरोपी गजाआड,
By सदानंद नाईक | Published: September 8, 2024 06:54 PM2024-09-08T18:54:26+5:302024-09-08T18:54:43+5:30
पोलिसांवर ताशेरे, आरोपी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-२, गुरवारी रात्री पैशाच्या वादातून एका सलुन चालकाची हत्या झाल्याची घटना उघड झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, दूध डेरीसमोर जस्ट कम नावाने हेअर कटिंग सलूनचे दुकान आहे. या सलूनचा मालक इलियास शेख हे गुरवारी रात्री आपल्या दुकानात काम करत होते. त्यावेळी अमर कन्हैयालाल माखिजा याने त्यांच्यावर अचानक हल्ला करून, इलियासच्या पोटात वार केले. या हल्ल्यात इलियासला गंभीर जखमी झाला. या हल्लेची घटना सीसीटीव्ही कैमेऱ्यात कैद झाली. हल्लेनंतर इलियास शेख यांला मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनंतर तब्येत बिघडल्याने अंबरनाथ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती सुधारली नाही. अखेर शुक्रवारी पहाटे त्यांला मुंबईतील एका रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
इलियास शेख यांचा अमर माखिजासोबत काही वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू होता, त्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेच्या वेळी माखिजा दारूच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी यापूर्वी आरोपी माखिजा याला कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. मात्र आता इलियास शेख यांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत इलियास शेख हे अंबरनाथच्या जावसई गावचे रहिवासी असून त्यांच्या पश्चात वृद्ध आई व पत्नी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंब उघडल्यावर पडल्याचे बोलले जाते. या प्रकरणी पुढील तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.