Nalasopara: मित्रासह सावत्र आई व तीन अल्पवयीन भावंडाची हत्या, आरोपीला २३ वर्षांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 19:41 IST2025-03-21T19:39:17+5:302025-03-21T19:41:00+5:30
हत्या केल्यापासून आरोपी तुर्भे, वालीव, सुरत, बंगळुरू याठिकाणी सुरक्षा रक्षक, प्लम्बिंग, मेकॅनिक म्हणून काम करत आरोपी निरंजन उर्फ रंजन उर्फ राजू उर्फ अक्षय या नावाने राहत होता.

Nalasopara: मित्रासह सावत्र आई व तीन अल्पवयीन भावंडाची हत्या, आरोपीला २३ वर्षांनंतर अटक
-मंगेश कराळे, नालासोपारा
मित्रासह सावत्र आई व तीन सावत्र अल्पवयीन भावंडाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला बंगळुरू येथून १८ मार्चला अटक करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली. २३ वर्षांपूर्वी तो हत्या करून फरार झाला होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरोपी राजू उर्फ अक्षय शुक्ला आणि त्याचा जिवलग मित्र मनोज साह (२५) हे दोघे वालीवच्या नाईक पाड्यातील शिव भीमनगर येथे राहत होते. एकमेकांच्या राहत्या घरचे असलेल्या सामाईक भिंतीचा वाद राग धरून २६ मार्च २००८ रोजी रात्री चिंचपाडा येथील कल्पतरू इंडस्ट्रीयल इस्टेट मधील युटिलिटी प्रिंटर्स या कंपनीचे पोटमाळ्यावर मनोजचे डोके भिंतीवर आपटून लेसने गळा आवळून हत्या केली होती. २७ मार्च २००८ रोजी माणिकपूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस पथकाने गुन्ह्याची माणिकपूर पोलीस ठाण्यातून माहिती घेवून सातत्याने पाठपुरावा करत गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पण तो वेगवेगळ्या नावाने व जागा बदलत असल्याने सापडत नव्हता.
हत्या केल्यापासून आरोपी तुर्भे, वालीव, सुरत, बंगळुरू याठिकाणी सुरक्षा रक्षक, प्लम्बिंग, मेकॅनिक म्हणून काम करत आरोपी निरंजन उर्फ रंजन उर्फ राजू उर्फ अक्षय या नावाने राहत होता.
सावत्र आई, दोन बहिणी आणि भावाची हत्या
पश्चिम बंगालमध्ये आरोपीने २००२ साली सावत्र आई गीताकुमारी शुक्ला, सावत्र बहिणी पुजाकुमारी (७), प्रियंका कुमारी (६) आणि सावत्र भाऊ मान (२) या घरातील चौघांची हत्या करून फरार झाला होता.
विशेष म्हणजे आरोपीच्या वडिलांनी हल्दीया पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला होता. निवडणूक ओळखपत्रामुळे आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सपोनि सोपान पाटील व सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार मुकेश पवार, रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, राजाराम काळे, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकूर, अकिल सुतार, राहुल कर्पे, अनिल साबळे, अजित मैद, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सायबरचे सहा फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.