भिवंडीत अपहृत मुलाची खंडणीसाठी हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:48 PM2018-11-02T23:48:46+5:302018-11-02T23:51:50+5:30
शहरात धामणकरनाका, विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गाजवळ पाइपलाइनमध्ये आढळला.
भिवंडी : शहरात धामणकरनाका, विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गाजवळ पाइपलाइनमध्ये आढळला. याप्रकरणी पोलिसांनी वाहीद अन्सारी (२०) या तरुणास अटक केली आहे. दुसरा आरोपी आपल्या कुटुंबासह शहरातून पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिलाल शकील कुरेशी (१४) असे अल्पवयीन मुलाचे नाव असून तो निजामपूरमधील कुरेशीनगरमध्ये आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. तो गेल्या रविवारी सकाळी आपल्या वडिलांसोबत धामणकरनाकामधील बीफच्या दुकानात आला होता. दुपारी १२ च्या सुमारास अचानक तो दुकानातून गायब झाल्याने बिलालची शोधाशोध सुरू झाली.
तो कुठेही न सापडल्याने त्याच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात बिलाल याचे अपहरण झाल्याची तक्रार केली. दरम्यान, त्याच्या वडिलांना मोबाइलवरून पाच लाखांची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता.
गुरुवारी रात्री बिलालची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला असता मुंबई-नाशिक महामार्गावरील पाइपलाइनजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या गळ्याला रस्सी आवळून डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे.