ठाण्यात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून: पत्नीसह तिच्या मित्राला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:24 PM2019-01-01T21:24:54+5:302019-01-01T21:31:19+5:30
विवाहित असूनही फेसबुकवरुन वर्षभरापूर्वी मैत्री झालेल्या मित्राशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी गोपी नाईक या सफाई कामगार पतीचा खून करणा-या प्रिया नाईक (२८) आणि महेश कराळे या तिच्या मित्राला सोमवारी रात्री नेरुळ येथून कासारवडवली पोलिसांनी अटक केली.
ठाणे: अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या गोपी (३०) या आपल्याच पतीचा महेश कराळे (२८, रा. नेरळ, जि. रायगड) या मित्राच्या मदतीने खून करणा-या प्रिया नाईक (२८) आणि तिच्या मित्राला सोमवारी रात्री नेरुळ येथून कासारवडवली पोलिसांनी अटक केली. अपघाताचा बनाव करुन या दोघांनीही जखमी गोपीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करुन पलायन केले होते.
घोडबंदर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफाल्य आवास या टीएमसी बिल्डींग मधील तिस-या मजल्यावर गोपी नाईक या ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार गोपी नाईक याला २९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याची पत्नी प्रिया हिने दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेतील ही व्यक्ती मृत पावल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितल्यानंतर ती तिथून पसार झाली. हा खूनाचा प्रकार असल्याचे आढळल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले आदींच्या पथकाने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रिया नाईक आणि तिचा कथित मित्र महेश कराळे या दोघांनाही नेरळ ( जि. रायगड) येथून सोमवारी रात्री ताब्यात घेतले. प्रिया विवाहित असूनही तिच्याशी महेशची फेसबुकद्वारे एक वर्षापूर्वी मैत्रि झाली होती. सहा महिन्यांपूर्वी ते एकमेकांच्या जास्त ‘जवळ’ आले. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार प्रियाचा पती गोपी याच्याही लक्षात आला. त्याने त्यांच्या या अनैतिक संबंधांना विरोध केला. त्यामुळेच त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. आपल्या अनैतिक संबंधाच्या आड येणा-या पतीचाच काटा काढायचे तिने ठरविले. त्यानुसार २९ डिसेंबर रोजी जेवणातून त्यांनी गोपीला झोपेच्या गोळया दिल्या. तो झोपी गेल्यानंतर त्याचा गळा आवळण्यात आला. नंतर रॉडने त्याच्यावर प्रहार करुन त्याचा खून करण्यात आला. तो अपघातात जखमी झाल्याचा बनाव करुन दोघांनी एका मोटारसायकलवरुन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू, इमारतीच्या सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचे बिंग फुटले आणि त्यांना अटक केल्याची माहिती ढोले यांनी दिली. दोघांनाही ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.