भिवंडीत आदिवासी महिलेची हत्या ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:29+5:302021-03-20T04:40:29+5:30
भिवंडी : येथील काटई ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपाडा-मांगतपाडा येथील ३३ वर्षीय आदिवासी महिला गुरुवारी सायंकाळी घरातील बकऱ्या चरण्यासाठी घरापासून ...
भिवंडी : येथील काटई ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपाडा-मांगतपाडा येथील ३३ वर्षीय आदिवासी महिला गुरुवारी सायंकाळी घरातील बकऱ्या चरण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेलारगावाजवळील जोगमोरी या जंगलात गेली होती. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास तिचा मृतदेह नातेवाइकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे सकाळी तालुका पोलिसांनी या महिलेच्या मृत्यूची नोंद आकस्मिक निधन केलेली असताना नातेवाइकांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून तिच्या संशयास्पद मृत्यूचा सखोल तपास करण्याचा आग्रह तालुका पोलिसांकडे धरला. अखेर शुक्रवारी सायंकाळी तिच्या हत्येची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मात्र, घटनास्थळी मृत महिलेचे अंतवस्त्र व ओढणी आढळली असून, अंगावरचे दागिने व मोबाइल न आढळल्याने शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या १८ तासांनंतरही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून पत्नीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी व पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला कठोर शासन करावे, अशी मागणी मृत महिलेचा पती जीवन दिघे याने केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली आहे.