लिव्ह-इन-रिलेशनशिप राहणाºया महिलेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:35 AM2017-08-06T00:35:25+5:302017-08-06T00:35:32+5:30
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणा-या डॉली फ्रॉन्सिस रॉड्रिक्स (३७) हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विजय चंद्रकांत मळगावकर (४०) याने तिची गळा दाबून हत्या
ठाणे : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणा-या डॉली फ्रॉन्सिस रॉड्रिक्स (३७) हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विजय चंद्रकांत मळगावकर (४०) याने तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना वर्तकनगर परिसरात घडली. हत्येनंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाल्याने ही घटना उघडकीस आली. तसेच विजय याने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिठ्ठी लिहून तक्रार केली असून तशी एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.
वर्तकनगर, दोस्ती विहार येथील पाचव्या मजल्यावर राहणारी मयत डॉली आणि आरोपी विजय हे मागील १३ वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहतात. विजय हा विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. कोपरी पूर्व येथे एका ठिकाणी त्या दोघांची १३ वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याचदरम्यान, पत्नी आणि मुलाला सोडून तो डॉलीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागला होता. मूळ दोघेही गोव्याचे राहणारे असून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहताना त्यांना एक मुलगा झाला. याचदरम्यान, डॉली हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण विजयला लागल्यानंतर दोघांमध्ये हळूहळू खटके उडू लागले. त्यातूनच, डॉली एप्रिल महिन्यात ६ वर्षांचा मुलगा घेऊन गोव्याला आईकडे गेली. तसेच ती त्याला गोव्याला ठेवून जून महिन्यात पुन्हा ठाण्यात त्याच्याकडे आली. दरम्यान, विजय याच्या मनात संशयाने चांगलेच घर केले होते. त्या संशयावरून आलेल्या रागातून त्याने तिची शुक्रवारी घरात दोन्ही हाताने गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर काही तासांतच त्याने थेट पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन केला. त्यानुसार, वर्तकनगर पोलिसांनी पाहणी करून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालयाने त्याला ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती दिली.
तक्रार करण्यासाठी दिल्ली गाठली
विजय याला डॉलीचे अन्य दोघांबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर तो तिचा रागराग करू लागला. तरीसुद्धा ते एकत्र राहत होते. याचदरम्यान, त्याने जुलै महिन्यात तिची तक्रार पंतप्रधान मोदी यांना चिठ्ठीद्वारे केली. ती चिठ्ठी त्याने दिल्लीला जाऊन पंतप्रधान कार्यालयात दिली. तशी एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये किती तथ्य आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.