शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:13 AM2018-12-07T04:13:50+5:302018-12-07T04:14:05+5:30
समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे.
अंबरनाथ : समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे. महिलांना समान हक्क असले, तरी समाजातील अपप्रवृत्ती आजही महिलांवर अन्याय आणि अत्याचार करत आहेत. कौटुंबिक वादातूनही महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात, असे मत अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले.
अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला बालकल्याण आणि तालुका विधी सहायक समितीच्या पुढाकाराने महिला अत्याचार रोखण्यासाठी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर चर्चासत्र झाले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुबल, सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, सभापती रेश्मा काळे आणि पालिकेच्या विधी सल्लागार अॅड. साधना निंबाळकर उपस्थित होते. अंबरनाथ रोटरी क्लबच्या खुल्या सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम झाला.
कुबल यांनी चित्रपटांतील भूमिका आणि वास्तवातील भूमिका यात काही फरक जाणवत नाहीत, असे सांगितले. अनेक चित्रपटांत महिलांवरील अत्याचारांच्या भूमिका आपण केल्या आहेत. समाजातही महिलांवर अन्याय होतो. त्यामुळे आता समाजाची प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. महिला सर्व क्षेत्रांत पुढे असल्या, तरी आजही मुलीच्या जन्माचे हवे त्या मानाने स्वागत केले जात नाही. मुलीचा जन्म झाल्यावर मुलगा हवा होता, ही प्रतिक्रिया स्वत: महिलाच देतात. महिलाच जर मुलीच्या जन्माचा सन्मान करत नसतील, तर मग समाज सुधारण्याची इच्छा कुणाकडे व्यक्त करावी, असा प्रश्न पडतो. मुलगा आणि मुलीमधील भेद कमी झाला, तर समाजात काही प्रमाणात बदल घडतील. आज अनेक वृद्ध आईवडील वृद्धाश्रमात आपले जीवन जगत आहे. ती परिस्थिती पाहिल्यावर असे वाटते की, वंशाच्या दिव्यापेक्षा प्रकाश देणारी पणतीच बरी, असे त्यांनी सांगितले.
कुटुंबव्यवस्था सांभाळण्यासाठी घरातील महिलांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, असे नगराध्यक्षा वाळेकर यांनी सांगितले. अनेक वाद सामंजस्याने घेतल्यास ते पोलीस ठाण्यापर्यंत येणारही नाहीत. घरातल्या घरातही वाद मिटवणे शक्य आहे. घरात वाद मिटत नसतील, तर तालुका विधी सहायक समितीच्या पीव्हीएल सदस्यांच्या सहकार्याने हे वाद मिटवणे शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या विधी सल्लागार अॅड. साधना निंबाळकर यांनी महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ ही सामाजिक समस्या झाली आहे, असे सांगितले. कौटुंबिक वादातून होणारे अत्याचार असो वा समाजात वावरत असताना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना, या कमी करण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्या केल्या आहेत.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, सभापती रेश्मा काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, स्नेहल उपासनी, गुलाब जाधव, राजेश चव्हाण, सुप्रिया देसाई, विजय पवार, निखिल वाळेकर आणि सुभाष साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
>महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे!
महिलांना कायदेविषयक आणि पोलिसांची भूमिका याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. महिलांनी या बदललेल्या कायद्यांची माहिती घेणे गरजेचे आहे. आज कायदा हा महिलांना संरक्षण देत आहे. मात्र, या कायद्याचा गैरवापर होता कामा नये. आज महिलांकडे चुकीच्या नजरेने पाहणाºयालाही शिक्षा होऊ शकते. अत्याचारांच्या घटनांत पूर्वी सात वर्षांची शिक्षा होती. मात्र, आता त्यात बदल केले असून अत्याचार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा आणि गंभीर स्वरूपाच्या अत्याचारांच्या घटनांत जन्मठेप आणि फाशीची शिक्षाही देण्याची तरतूद आहे. कायद्यात झालेले हे बदल महिलांना संरक्षण देण्यासाठीच केले आहे. महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.