उसने घेतलेल्या ५०० रुपयांसाठी भिवंडीतील तरुणाची हत्या करणारा अटकेत

By जितेंद्र कालेकर | Published: October 10, 2024 11:44 PM2024-10-10T23:44:28+5:302024-10-10T23:44:45+5:30

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला; ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Murderer of Bhiwandi youth for borrowed Rs 500 arrested | उसने घेतलेल्या ५०० रुपयांसाठी भिवंडीतील तरुणाची हत्या करणारा अटकेत

उसने घेतलेल्या ५०० रुपयांसाठी भिवंडीतील तरुणाची हत्या करणारा अटकेत

जितेंद्र कालेकर , लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : उसने घेतलेले पाचशे रुपये परत न करणाऱ्या सुरेश तारासिंग जाधव (३५) याची लोखंडी पाइपने प्रहार करून हत्या करणाऱ्या बारकू मारुती पडवळे (२२) याला गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी गुरुवारी दिली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह कचराकुंडीत टाकून त्यावर कचरा टाकून तो जाळल्याची माहिती दिली.

भिवंडी तालुक्यातील गंगारामपाडा, वडपे भागातील सुरेश याची, ३ ऑक्टाेबर २०२४ रोजी सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास वैतरणा- तानसा ते मुंबईत जाणाऱ्या पाण्याच्या पाइपलाइनच्या पाइप क्रमांक ११३ जवळ अनोळखी आरोपींनी हत्या करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळल्याचे आढळले. भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच परिसरातील १२५ सीसीटीव्हींच्या आधारे बारकूचा सहभाग स्पष्ट झाला. गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार उमेश ठाकरे, हनुमान गायकर, पोलिस नाईक योगेश शेळकंदे, शशिकांत पाटील, जितेंद्र वारके आणि जयेश मुकादम यांच्या पथकाने त्याची चौकशी केली.

चौकशीमध्ये त्याने या खुनाची कबुली दिली. बारकू, त्याचा मित्र देवा (रा. चिंचवली) आणि सुरेश तिघेजण फेरीचा भंगार-विक्रीचा व्यवसाय करीत होते. सुरेशने त्याचा मित्र देवाकडून पाचशे रुपये उसनवारीने घेतले होते. उसने घेतलेले पैसे सुरेश परत करीत नव्हता. यातूनच ३ ऑक्टाेबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान वैतरणा तानसा या मुंबईकडे जाणाऱ्या पाइपलाइन मार्गाकडे त्याला नेऊन आधी दारू पाजण्यात आली. त्यानंतर उसने पैसे का देत नाही, याचा जाब विचारत त्याला मारहाण करून देवाने लोखंडी पाइपने सुरेशच्या डोक्यात प्रहार केला. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह दाेघांनी मिळून कचराकुंडीत टाकून त्यावर कचरा टाकून जाळल्याची कबुली बारक्याने दिली. यातील दुसरा आराेपी देवा याचाही शोध सुरू आहे.

Web Title: Murderer of Bhiwandi youth for borrowed Rs 500 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे