अत्याचारप्रकरणी नराधमाला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By अजित मांडके | Published: June 21, 2024 06:24 PM2024-06-21T18:24:22+5:302024-06-21T18:25:37+5:30
ही घटना 2018 मध्ये कोपरीत घडली होती.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: साडे पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुरली कन्हैयालाल चौहान (19) या नराधमाला ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (पोक्सो) डी एस देशमुख यांनी दोषी ठरवून शुक्रवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना 2018 मध्ये कोपरीत घडली होती.
आरोपी मुरली चौहान हा कोपरी पूर्व गांधी नगर येथे राहणारा असून त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या साडे पाच वर्षीय मुलीवर जबरी संभोग केला होता. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा खटला न्यायाधीश डी एस देशमुख यांच्या न्यायालयात आल्यावर विशेष सरकारी वकील संध्या म्हात्रे आणि व्ही जी कडू यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून न्यायाधीश देशमुख यांनी त्याला दोषी ठरवले. तसेच आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
याशिवाय दंड न भरल्यास 02 वर्ष अतिरिक्त कारवासाची शिक्षा भोगावी लागेल असे निकालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक के. एन. गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक एस एस जगताप यांनी केला. तर पैरवी म्हणून पोलीस शिपाई सुशिला विनोद डोके आणि कोर्ट अंमलदार म्हणून पोलीस हवालदार विजय लहानू सानप यांनी काम पाहिले.