खर्चाचे २०० रुपये दिले नाही म्हणून हत्या करणाऱ्यास जन्मठेप
By धीरज परब | Published: July 11, 2024 01:23 PM2024-07-11T13:23:33+5:302024-07-11T13:23:48+5:30
ठेकेदाराने कामासाठी ठेवलेले कर्मचारी येथेच लेबर कॅम्पमध्ये रहायचे .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - खर्चासाठी २०० रुपये दिले नाही म्हणून माळी काम करणाऱ्या कामगाराने सुपरवायझरची डोक्यात हातोडा मारून हत्या केली होती . बुधवार १० जुलै रोजी ठाणे न्यायालयाने हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप सह १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे .
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत दहिसर चेकनाका जवळ सिंगापुर इंटरनेशनल शाळा आहे . सदर शाळेतील उद्यानचे माळी काम करण्यासाठी गुजरातचा ठेकेदार नेमला होता . ठेकेदाराने कामासाठी ठेवलेले कर्मचारी येथेच लेबर कॅम्प मध्ये रहायचे .
२०२० साली लक्ष्मण दिता काकण ( ५८ ) सागवाडा , उदयपूर हा माळीकाम करणारा मजूरास महिना ५ हजार पगार व दर आठवड्यास २०० रुपये दिले जायचे . लक्ष्मण आजारी असल्याने कामावर आला नव्हता म्हणून सुपरवायझर देवा उर्फ देवीलाल हरिराम कलागुमन ( २५ ) मूळ रा . सलवाडा , उदयपूर , राजस्थान ह्याने खर्चाचे २०० रुपये इतर मजुरांना दिले मात्र लक्ष्मण ह्याला पैसे दिले नाहीत. त्याचा राग येऊन लक्ष्मणचे देवा सोबत भांडण झाले. त्या रागातून देवा झोपला असताना त्याच्या डोक्यात हातोडा मारून लक्ष्मण याने त्याची हत्या केली . देवा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता व त्याच्या शेजारी लक्ष्मण बसला असल्याचे आढळून आले.
तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ६ मे २०२० रोजी हत्येचा गुन्हा दाखल करत लक्ष्मण ह्याला अटक केली होती . तत्कालीन पोलीस निरीक्षक गणेश भामरे यांनी तपास अधिकारी म्हणून तपास केला होता . सदर हत्येचा खटला ठाणे न्यायालयात सुरु होता .
सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कारकून हवालदार नितीन कासार , शिपाई साईदास चव्हाण, अनिल मढवी, हवालदार सचिन बर्डे आदी न्यायालयाशी संबंधित काम करत होते . सरकारी अभियोक्ता ए . पी . लाडवंजारी व कोरडे यांनी न्यायालयात बाजू मांडली .
ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश आगरवाल यांनी तपास अधिकारी सह साक्ष व पुराव्यांच्या आधारे आरोपी लक्ष्मण ह्याला हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे .