संगीतकार सुधीर फडके यांच्या गीताचे सूर पुन्हा घुमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 02:55 PM2021-03-09T14:55:46+5:302021-03-09T14:56:00+5:30
ज्येष्ठ गायक रवींद्र साठे जे स्वतः मूळ गाण्यात गायलेले आहेत ते सुद्धा ह्या पुनर्निर्मितीचा भाग आहेत, त्यासोबतच आघाडीचे आणि लाडके गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शाल्मली सुखटणकर, ओमकार प्रभुघाटे ह्या गीतात गायलेले आहेत. रवींद्र साठे गाण्याबद्दल काही किस्से आणि आठवणी सुद्धा सांगणार आहेत. सुप्रसिध्द अभिनेत्री, कवयित्री, निवेदिका स्पृहा जोशी ह्यामध्ये निवेदन करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाल्मिकी रामायण स्वरबद्ध करणारे सुप्रसिद्ध संगीतकार बाबूजी म्हणजेच सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केलेले आणि सुधीर मोघे ह्यांनी शब्दबद्ध केलेले, १९८४ साली प्रदर्शित झालेल्या माहेरची माणसं ह्या चित्रपटातलं बारा ज्योतिर्लिंगांवर आधारित तिथे नांदे शंभू कैलासाचा पती हे गीत पुन्हा एकदा नव्या स्वरूपात रिलीज होणार आहे.
ज्येष्ठ गायक रवींद्र साठे जे स्वतः मूळ गाण्यात गायलेले आहेत ते सुद्धा ह्या पुनर्निर्मितीचा भाग आहेत, त्यासोबतच आघाडीचे आणि लाडके गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शाल्मली सुखटणकर, ओमकार प्रभुघाटे ह्या गीतात गायलेले आहेत. रवींद्र साठे गाण्याबद्दल काही किस्से आणि आठवणी सुद्धा सांगणार आहेत. सुप्रसिध्द अभिनेत्री, कवयित्री, निवेदिका स्पृहा जोशी ह्यामध्ये निवेदन करणार आहे.
ह्या पुनिर्मितीची संकल्पना एकदंत थिएटर्सचे संस्थापक दिव्येश बापट ह्यांची असून गीतांचा हा जूना ठेवा सर्वांपर्यंत परत पोहोचावा आणि मुख्यत्वे करून नव्या पिढीला सुद्धा ह्या गाण्यांची माहिती असावी असा ह्यामागचा उद्देश आहे. मराठीमध्ये बहुदा हे एकमेव गीत आहे जे १२ कडव्यांचे आहे आणि ते पूर्ण गायले जाते. बाबूजींची गाणी ऐकायला सोप्पी सहज आणि मनात घर करून राहणारी असली तरी ती गाण्यासाठी तेवढी सोपी नाहीत ह्याचा पुनःप्रत्यय या गाण्यातून मिळतो.
ह्या गाण्याची पुनर्ररचना आघाडीचा संगीतकार/संगीत संयोजक प्रणव हरिदास ह्याने अतिशय सुंदररित्या केलेली आहे. गाण्यामध्ये ज्येष्ठ सतार वादक पंडित उमाशंकर शुक्ला, श्रेयस गोवित्रीकर, गंधार जोग, प्रणव हरिदास, सौरभ शिर्के, योगेश लोरेकर ह्यांनी वादनाची साथ केली आहे.
ह्या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन गणेश पोकळे ह्यांनी केले असून गाण्याचे चित्रीकरण आणि संकलन गुरुनाथ संभूस ह्याने केले आहे.
बापट कसन्ट्रक्शन्स हे ह्या गाण्याचे प्रायोजक आहेत. स्मृतिगंध सारख्या नावाजलेल्या आणि गंधर्वगान, साज तरंग सारख्या अतिशय दर्जेदार वेबसिरीज तसेच नवोदित गायकांना एक उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या चॅनलवर हे गाणं रिलीज होणार आहे. हे गाणं महाशिवरात्री च्या दिवशी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजता "स्मृतिगंध"च्या फेसबुक पेज आणि यू ट्यूबवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आणि सुधीर मोघे ह्यांना आदरांजली वाहण्याचा हा संस्थेचा एक छोटासा प्रयत्न आहे असे आयोजकांनी सांगितले.