कालानुरूप नाटकातील संगीत बदलले नाही - प्रा.डॉ. विजय जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:25 AM2019-06-03T00:25:14+5:302019-06-03T00:25:20+5:30

मराठी नाट्यसंगीत : स्वरूप आणि समिक्षा’ या पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन

Music from time to time did not change - Prof. Dr. Vijay Joshi | कालानुरूप नाटकातील संगीत बदलले नाही - प्रा.डॉ. विजय जोशी

कालानुरूप नाटकातील संगीत बदलले नाही - प्रा.डॉ. विजय जोशी

googlenewsNext

ठाणे : संगीत नाटकांत संगीताचा अतिरेक झाल्यामुळे संगीत नाटकापासून प्रेक्षक दूर होत गेला. चित्रपटांत संगीत कायम राहिले, कारण ते प्रवाहाबरोबर बदलत गेले. कालानुरूप मराठी संगीत नाटकातले संगीत बदलत गेले असते, तर संगीत नाटकाची परंपरा ओघाने पुढे गेली असती. भावनांना पूरक असे संगीत नाटकांतून मांडले गेले, तर संगीत नाटकांना ऊर्जितावस्था मिळेल, असे परखड मत शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले.

मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे आणि व्यास क्रिएशन्स आयोजित पुस्तक आदानप्रदान महोत्सवात रविवारी डॉ. विजया टिळक लिखित ‘मराठी नाट्यसंगीत : स्वरूप आणि समिक्षा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वा.अ. रेगे सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. जोशी पुढे म्हणाले, आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नावाची गोष्टच होत नाही. मराठी नाटकांचे डॉक्युमेंटेशन नाही. त्याबाबत, आपल्याकडे उदासीनता आहे. डॉ. टिळक यांचे साहित्यावरचे प्रेम आणि त्यांची नाटकांबाबत असलेली ओढ तसेच त्यांना स्वरांचा कानदेखील असल्यामुळे त्यांनी हा ग्रंथ रसिकतेतून साकारला आहे. आपल्याकडे दिग्गजांनी लिहिलेला आविष्काराबाबत योग्य संदर्भसूची ग्रंथ नाही. नाटक आणि संगीत नाटक हा मराठी संस्कृतीचा ठेवा आहे आणि तो वेगळा आहे, याबद्दल दुमत नाही. एखाद्या नाटककाराचे शब्द आणि शब्दांमागचा आशय रसिकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याला संगीताची जोड असल्यास ते रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. आताचे नट हे ‘अ‍ॅडिशनल’ घेतात आणि ‘अ‍ॅडिशन’ घेण्याचा मोह त्यांना होतो. तसाच मोह संगीत नटांना झालेला असावा. संगीत नाटकांतील नट हे नाटकातले भाव पोहोचवण्याऐवजी स्वत:चे संगीत पेश करतात, तेव्हा संगीत नाटकांचा उत्कर्ष थांबला. जेव्हा नाटकाची जाहिरात होत असे, तेव्हा पहिले संगीत मग नाटकाचे नाव, अशी होत असे. आमच्या नाटकात पहिले संगीत असणारे हे सांगितले जात असत. नाट्य आणि संगीत यांचे योग्य प्रमाण राखले असते, तर संगीत नाटक मागे राहिले नसते.

परीक्षण प्रकार हा नाटकात नाही, तो वेगळा प्रकार आहे. वृत्तपत्रात छापून येणारे नाटकाचे परीक्षण, हे परीक्षण नव्हे, तर तो रिपोर्ट आहे. नाटक हा साहित्याचा प्रकार आहे, हे लोक अजूनही मानायला तयार नाहीत. तो कला प्रकारच मानला जातो. जेव्हा शब्द अपुरे पडतात, तेव्हा काव्य आणि संगीत त्या शब्दांना पुढे घेऊन जाऊ शकतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख म्हणाले की, नाटकातला संगीत हा भाग अतिशय विलक्षण आहे. नाटकात संगीत आले. त्यात गायक, नटांचे मोठे योगदान आहे. नाट्यसंगीताची वाटचाल, त्याचा आलेख, नकाशा, त्याचा विकास हा महत्त्वाचा आहे, असे मत व्यक्त करत अभ्यासक, समीक्षक हा दशभुजेसारखा असावा. तो स्वत: विविध दिशांनी वाढलेला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर, ज्येष्ठ पत्रकार श्री.वा. नेर्लेकर, हेमंत काणे आणि व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्रीरंग खटावकर यांनी केले. यावेळी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अभिनय कट्टा, अत्रे कट्टा, ब्रह्मांड कट्टा, टॅग, अजेय संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखा यांचा सत्कार करण्यात आला.

या पुस्तकांचा झाला गौरव
चरित्र-आत्मचरित्र : बहुरूपिणी : अंजली कीर्तने, कादंबरी : जीर्णोद्धार : संतोष हुदलीकर, कथा : चाहूल उद्याची : सुबोध जावडेकर, कविता : भातालय : नामदेव गवळी, अनुवाद : एसीएन नंबियार : वपाला बालचंद्रन, सुजाता गोडबोले, प्रवास : पुन्हा यांकीजच्या देशात : डॉ. अच्युत बन, पर्यावरण : वृक्ष - अनुबंध : प्रा. नीला कोर्डे, विज्ञान : या शोधाशिवाय जीवन अशक्य : डॉ. प्रबोध चोबे, बालविभाग : मिसाइल मॅन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम : एकनाथ आव्हाड, इतिहास : रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा : रवी आमले, आदींना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तर ललित विभागात ‘चांगभलं’, लेखक साहेबराव ठाणगे. ललितेतर विभाग ‘कापूस सरकीपासून सुतापर्यंत’, लेखक राजीव जोशी यांना अ‍ॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Music from time to time did not change - Prof. Dr. Vijay Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.