कोळी महोत्सवात विठ्ठल उमप यांना संगीतमय आदरांजली
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 22, 2023 02:31 PM2023-11-22T14:31:51+5:302023-11-22T14:32:39+5:30
चेंदणी बंदर जेटी येथे होणाऱ्या या महोत्सवाचे यावर्षी १८ वे वर्ष आहे.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : लोकसंगीत विशेषतः कोळी गीतांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उपमाना संगीतमय आदरांजली हे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित यदांच्या कोळी महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. यंदा रविवार, २६ नोव्हेंबर रोजी चेंदणी बंदर जेटी येथे होणाऱ्या या महोत्सवाचे यावर्षी १८ वे वर्ष आहे.
या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने कोळी पद्धतीचे खाद्यपदार्थ, कोळी समाज लोकजीवन,व्यवसाय यांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. प्रारंभी संध्याकाळी ५ वाजता चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा चेंदणी बंदरावर आल्यानंतर समाजातील मोरेकर अभ्यासिकेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणित विषयाचे मार्गदर्शन करणारे हरेश्वर आणि भारती मोरेकर, कोळीवाड्यातील जेष्ठ गायक, रंगावलीकार रवींद्र आणि प्रमिला कोळी आणि विलास आणि दुर्गा कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. या महोत्सवाचे औचित्य समाजात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा गौरविण्यात येणार आहे. त्यात दीर्घ पल्ल्याचे जलतरणपटू गौरी आणि जयराज नाखवा हे बहीणभाऊ,डॉ अंकिता संतोष कोळी, कोळी समाजातील चाली रिती, पदार्थ जीवनमान यांचे अभ्यासक पराग आणि कादंबरी कोळी दांपत्य तलवारबाजीत छाप पाडणारी वैष्णवी पाटील, संगीत क्षेत्रातील सचिन नाखवा, चेतन कोळी , यांच्यासह शैक्षणिक विभागात यंदाच्या शालांत परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवणारी कृतिका कोळी, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्यात दुसरा आलेला शारव नांगरुत यांना सन्मानित करण्यात येईल.
२६ नोव्हेंबर हा लोकशाहीर आणि आपल्या वेगळ्या गायकी शैलीत कोळी गाण्यांना अजरामर करणाऱ्या विठ्ठल उमप यांचा स्मृतिदिन. या कार्यक्रमात संगीतमय पद्धतीने विठ्ठल उमप यांना सांगीतिक आदरांजली वाहणार आहेत. याशिवाय कोळी गाणी , नृत्ये आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाकरता गौरवचिन्हे ऍडव्होकेट अनुराधा टिल्लू यांनी आपली आई रजनी निनाद कोळी यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली आहेत. हा कोळी महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हातभार लागले असून ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंचाचे विक्रांत कोळी यांनी केले आहे.