भावी सैनिकांच्या मदतीसाठी सरसावले मुस्लिम तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:14 AM2019-12-22T01:14:56+5:302019-12-22T01:15:02+5:30
सहकार्याचा पुढे केला हात । स्वत: केला खाण्यापिण्याचा खर्च
कुमार बडदे
मुंब्रा : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरुद्ध मुस्लिम समाज आक्रमक झाला असतानाच सैनिकभरतीसाठी मुंब्य्रात येत असलेल्या उमेदवारांसाठी येथील मुस्लिम समाजाने खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे व देशप्रेमाचे दर्शन घडवले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत. या कायद्यामुळे दोन धर्मांमध्ये विभागणी होणार असल्याच्या कथित चर्चांमुळे नाहक चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्य्रातील एमएम व्हॅली या सोसायटीमधील मुस्लिम समाजातील काही तरुण सैनिकभरतीसाठी येत असलेल्या उमेदवारांसाठी खाद्यपदार्थांची व पाण्याची व्यवस्था करून ‘मजहब नही सिखाता आपस मैं बैर रखना’ या प्रसिद्ध काव्यपंक्तीचे तंतोतत दर्शन घडवत आहेत. सैनिक दलातील विविध पदांसाठी कौसा येथील स्टेडियममध्ये वैद्यकीय तसेच शारीरिक चाचण्या सुरू आहेत. १३ ते २७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या चाचण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांतील तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील तरु ण येत आहेत. जेथे ही भरतीप्रक्रिया सुरू आहे, तेथे तरुणांच्या खाण्यापिण्याची कुठलीच सोय नाही. शिवाय, येणारे तरु ण परिसराबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांची खाण्यापिण्याची मोठ्या प्रमाणावर आबाळ होत होती. हीच बाब एमएम व्हॅली सोसायटीमधील काही मुस्लिम तरुणांनी हेरली. हे तरुण छोट्या नोकºया करतात. त्यातून मिळणाºया कमाईतून चार पैसे बाजूला काढून त्यांनी या उमेदवारांची अडचण ओळखून खाद्यपदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भरतीसाठी आलेल्या तरु णांनी समाधान व्यक्त केले. एमएम व्हॅली सोसायटीमधील या तरुणांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आमची नावे प्रसिद्ध करू नका, अशी विनंती केली, हे विशेष.
सैनिकभरतीकरिता आम्ही गेले काही दिवस मुंब्रा येथे आलो असून जवळपास उपलब्धता नसल्याने आमची खाण्यापिण्याची आबाळ होत होती. मात्र, तेथे वास्तव्य करणाºया काही मुस्लिम तरुणांनी आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून आम्हाला मोठा दिलासा दिला.
- मंगेश जाधव, नांदगाव / निनाद चव्हाण, मनमाड