'मराठीचा अभिमान रोजच बाळगला पाहिजे!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:57 AM2020-02-23T00:57:05+5:302020-02-23T00:57:09+5:30

इंग्रजी माध्यमातून मुले शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचे मराठी अवांतर वाचन वाढवण्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. - रत्नाकर मतकरी

'Must be proud of Marathi daily!' | 'मराठीचा अभिमान रोजच बाळगला पाहिजे!'

'मराठीचा अभिमान रोजच बाळगला पाहिजे!'

googlenewsNext

मराठी भाषा गौरव दिन गुरुवारी, २७ फेब्रुवारीला सर्वत्र साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक रत्नाकर मतकरी यांच्याशी साधलेला संवाद...

मराठी भाषा दिन कसा साजरा करावा? याबद्दल काय वाटते?
मराठी भाषेचे प्रेम हे आपल्याला कायमच वाटत असते. त्यामुळे विशेष दिनाच्या निमित्ताने अचानक एक दिवस आपला अभिमान जागा व्हावा आणि इतर दिवशी आपल्याला मराठीचा विसर पडावा, असे असू नये. आपण रोजच आपल्या भाषेचा किंवा संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. दुसरीकडे हाही विचार मनात येतो की, सध्याच्या बदलत्या युगात निदान त्या दिवसाच्या निमित्ताने का होईना एरव्ही पूर्णपणे दुर्लक्षित झालेल्या लोकांना भाषेची, संस्कृतीची आठवण होते, असेही असेल. पण, हे दिवस साजरे करण्यापेक्षा त्यामागची जी भावना आहे, ती महत्त्वाची आहे. ती वर्षभर जोपासली पाहिजे.

आता सकस लिखाण होतेय का?
आमच्या काळातील लिखाणात सकसता होती, कारण लिखाणाचा आनंद घेण्यावर जास्त भर होता आणि इतर महत्त्वाकांक्षा कमी होत्या. आताही लिहिण्याचे कौशल्य नक्कीच आहे, पण खूप ठिकाणी ते विभागले जातेय. म्हणजे लिहिणाऱ्याला असेही वाटते की, साधी कथा लिहून मासिकात येण्यापेक्षा जर एखादी मालिका लिहिली किंवा वेबसिरीज लिहिली, तर त्यातून जास्त पैसे मिळतील. एखादा सिनेमा लिहिला तर अधिक नाव होईल. तर, या सगळ्यांत त्यांचे कौशल्य थोडे विभागले जातेय.

शाळेत वाचन कमी झाले आहे?
मुलांना इंग्रजी माध्यमात घातल्यामुळे त्यांचा मराठीचा सराव सुटला आहे. परिणामी, मराठी वाचन कमी झालेय. आमच्या नातवंडांना किंवा आमच्याकडे नाटकात जी मुले येतात, त्यांना बोललेले किंवा वाचून दाखवलेले मराठी समजते, पण स्वत: वाचायला कष्ट पडतात. मग, भाषेच्या संवर्धनासाठी इतर प्रयत्न केले जातात. शाळेत रोजच्या तासात जे वाचले जाते, त्याचा अधिक परिणाम होतो.

आज महागाई वाढल्याने कलाकारांनी आपली आर्थिक जबाबदारी वाढवून घेतली आहे. परिणामी, पूर्वीच्या कलावंतांचा जो साधेपणा होता, तो टिकवून ठेवणे कुठेतरी परवडत नाहीये. त्यामुळे कौशल्य असूनही अर्थार्जनाकडे जास्त लक्ष द्यावे लागत आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम कसे असावेत?
सध्या कार्यक्र मांतून अभिवाचन व्हायला लागले आहे, जेणेकरून जुने, उत्तम साहित्य प्रेक्षकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचतेय, पण अजून त्याला योग्य स्वरूप आलेले नाही. ज्यांना करावेसे वाटते, ते कलाकार अभिवाचन करतात. कारण, यात किती व्यक्तींना रस असेल किंवा यातून किती अर्थार्जन होईल, याची शाश्वती नाही. म्हणजे, जो आपल्या इतर कार्यक्रमांवर खर्च केला जातो, तसा खर्च अभिवाचन कार्यक्र मांवर केला जात नाही, जो खरे म्हणजे केला पाहिजे.

Web Title: 'Must be proud of Marathi daily!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.